Omraje Nimbalkar | धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या निवासस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या भेटीदरम्यान मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. शिंदे गटातील दोन कार्यकर्त्यांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर दोघेही एकमेकांवर धावून गेले. खासदारांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याने धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
पालकमंत्र्यांच्या भेटीदरम्यान कार्यकर्ते भिडले :
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे सदिच्छा भेटीसाठी ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांच्या आगमनाची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील (Shiv Sena Shinde Faction) अनेक कार्यकर्ते खासदारांच्या घरी जमले होते. पालकमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्येच अचानक किरकोळ कारणावरून बाचाबाची सुरू झाली. सुरुवातीला हा प्रकार केवळ शाब्दिक वादापुरता मर्यादित होता.
मात्र काही क्षणांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर त्यांनी एकमेकांवर धाव घेतली आणि थेट फ्री-स्टाईल हाणामारी सुरू केली. खासदारांच्या निवासस्थानाच्या आवारात अचानक झालेल्या या राड्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या इतर कार्यकर्त्यांसह नागरिकांचीही धावपळ उडाली. मात्र, या दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Omraje Nimbalkar | जयराजे निंबाळकरांनी मध्यस्थी करत वाद थांबवला :
हाणामारी सुरू झाल्याचे लक्षात येताच ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयराजे निंबाळकर (Jairaje Nimbalkar) यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी दोन्ही कार्यकर्त्यांना एकमेकांपासून दूर केले आणि परिस्थिती शांत करण्यासाठी मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नानंतर निवासस्थानाच्या परिसरातील तणाव कमी झाला. मात्र, पालकमंत्री आणि खासदारांच्या उपस्थितीत घडलेल्या या घटनेमुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात या राड्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, जयराजे निंबाळकर यांच्या राजकीय पदार्पणाबाबतही सध्या चर्चा रंगली आहे. जयराजे यांचा वाढदिवस असल्याने प्रताप सरनाईक ओमराजे निंबाळकर यांच्या घरी स्नेहभोजनासाठी आले होते. यावेळी खासदारांनी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमवून पालकमंत्र्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जयराजे निंबाळकर यांचे राजकीय लॉन्चिंग करण्याची तयारी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी जयराजे यांच्या वाढदिवसानिमित्त तेर आणि परिसरात त्यांना ‘भावी आमदार’ म्हणून संबोधणारे बॅनरही लावण्यात आले होते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर झालेल्या कार्यक्रमाकडे राजकीयदृष्ट्याही पाहिले जात आहे.








