Rahul Gandhi | राहुल गांधी यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर तरुण आणि विद्यार्थ्यांशी संवाद वाढवण्यावर भर दिला आहे. शिक्षण, रोजगार आणि तरुणांचे प्रश्न यांसारख्या मुद्द्यांवरून ते केंद्र सरकारवर टीका करत आहेत. आता त्यांचा पुढील दौरा महाराष्ट्रात होणार असून 22 ऑगस्ट रोजी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमातून ते विद्यार्थी आणि तरुणांशी संवाद साधणार आहेत.
22 ऑगस्टला पुण्यात ‘छात्रों की गूंज’ :
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. देशातील मुलींना सुरक्षित वातावरण, समान हक्क, पुढे जाण्याच्या संधी आणि स्वतःचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असा मुद्दा त्यांनी मांडला आहे. मात्र, प्रत्यक्षात मुलींना हे अधिकार आणि संधी सहज मिळतात का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आपल्या हक्कांसाठी मुलींना अजूनही प्रतीक्षा का करावी लागते, यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे.
पुण्यात 22 ऑगस्ट रोजी ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांनी त्यांना नावनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राहुल गांधी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. जेन झी (Gen Z) मधील तरुणांशी संपर्क वाढवून त्यांच्या प्रश्नांना राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे या कार्यक्रमातून दिसून येत आहे.
Rahul Gandhi | काँग्रेसकडून कार्यक्रमाची जोरदार तयारी :
राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याची तयारी काँग्रेसकडून आधीपासूनच सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal), माजी मंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam), यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि मनोज त्यागी (Manoj Tyagi) यांच्यासह पक्षातील इतर नेते व पदाधिकारी कार्यक्रमाच्या नियोजनात सहभागी झाले आहेत. तरुण आणि विद्यार्थ्यांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवण्यासाठी पक्षाकडून तयारी केली जात आहे.
यापूर्वीही राहुल गांधी यांनी विविध प्रसंगी तरुणांशी संवाद साधला आहे. दरम्यान, जेन झींच्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही सोशल मीडिया माध्यमातून तरुणांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तरुण मतदारांशी संपर्क साधण्याची स्पर्धा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी काँग्रेस यांच्यात वाढत असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. आगामी निवडणुका आणि त्याआधीचे राजकीय डावपेच लक्षात घेता, तरुणांना आपल्या बाजूला आकर्षित करण्यात भाजपा आणि काँग्रेसपैकी कोणाला कितपत यश मिळते, याकडे आता लक्ष लागले आहे.






