जाळपोळ, रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन; नागपुरात सध्या कशी आहे परिस्थिती?

On: March 18, 2025 7:46 AM
Nagpur Violence Curfew Imposed
---Advertisement---

Nagpur violence | नागपूरमध्ये औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवरून उसळलेल्या वादानंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. काल रात्री दोन गटांमध्ये जोरदार संघर्ष झाला, ज्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि जाळपोळ घडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असून, शहरातील काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (Nagpur violence)

नागपुरात हिंसाचारानंतर तणावग्रस्त परिस्थिती

औरंगजेब कबर हटवण्याच्या मागणीवरून नागपूरच्या महाल परिसरात दोन गट समोरासमोर आले. काही वेळातच या वादाने हिंसक वळण घेतले आणि जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावाने वाहनांची तोडफोड करत जाळपोळ सुरू केली. पोलिसांवरही हल्ला चढवण्यात आला, ज्यात काही अधिकारी जखमी झाले.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत कोम्बिंग ऑपरेशन राबवले आणि जवळपास 50 जणांना ताब्यात घेतले. हिंसाचाराचा परिणाम संपूर्ण शहरावर दिसून आला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळीही शहरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली.

संचारबंदी आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त

काल रात्रीच्या घटनांनंतर शहरातील महाल आणि आजूबाजूच्या परिसरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तीन झोनमधील सात ते आठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत पाच किंवा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांच्या गस्तीदरम्यान नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रात्री 12 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली, मात्र अनेकांना याची कल्पना नसल्याने सकाळपासून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पोलिसांच्या गाड्या सतत परिसरात गस्त घालत असून, शांतता राखण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. (Nagpur violence)

नेमकं घडलं काय?

औरंगजेबाच्या कबरीवरून सुरु झालेल्या वादाने रात्री उग्र रूप धारण केले. महाल परिसरात दोन गटांमध्ये अचानक तणाव निर्माण झाला आणि दगडफेक सुरू झाली. या संघर्षामुळे अनेक वाहने जाळली गेली, चारचाकी आणि दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. काही समाजकंटकांनी अगदी जेसीबी वाहनही पेटवून दिले, ज्यामुळे आगीचा भडका उडाला आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

शहरात अजूनही तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Title : Nagpur Violence Curfew Imposed Heavy Police Deployment in the City

 

Join WhatsApp Group

Join Now