Gulabrao Patil | महायुतीतील शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत मतभेद अधूनमधून नेत्यांच्या वक्तव्यांतून समोर येत असतात. जळगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. व्यासपीठावर भाजप आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) उपस्थित असताना त्यांनी सहकार, दूध संघ आणि राजकीय संबंधांवर मिश्कील पण सूचक भाष्य केले.
मंगेश चव्हाणांसमोर गुलाबराव पाटलांची फटकेबाजी :
जळगावमध्ये झालेल्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत भाषण केले. यावेळी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे देखील मंचावर उपस्थित होते. आपल्या भाषणातून पाटील यांनी माजी मंत्री आणि सहकार क्षेत्रातील नेते जे. टी. महाजन यांच्या कार्याचा उल्लेख केला. महाजन उच्चशिक्षित असूनही अत्यंत साध्या स्वभावाचे होते आणि त्यांचे शेतीशी घट्ट नाते होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी साखर कारखाने तसेच विविध सहकारी संस्थांचे जाळे उभे केले, असे पाटील यांनी सांगितले.
जिल्हा दूध संघाच्या कारभाराचा संदर्भ देताना त्यांनी मंगेश चव्हाण यांना उद्देशून खोचक टिप्पणी केली. दूध संघाच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे असल्याचे सांगत त्यांनी संघाचा कारभार चांगला चालवण्याचा सल्ला दिला. तसेच कार्यक्रम केला, तर कार्यक्रम होईल, अशा शब्दांत त्यांनी चव्हाण यांच्यावर राजकीय टोला लगावला. सहकार क्षेत्रातील साखर कारखाने अडचणीत येत असताना खासगी कारखाने मात्र कसे सुरू राहतात, असा सवालही त्यांच्या भाषणातून उपस्थित करण्यात आला.
Gulabrao Patil | “भोळा राहिलो तर भाजपवाले खातील”
गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात केलेल्या एका वक्तव्याने विशेष लक्ष वेधून घेतले. “मी भोळा राहिलो तर मला भाजपवाले खाऊन जातील,” असे ते म्हणाले. या विधानामुळे कार्यक्रमस्थळी आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. मात्र, यानंतर त्यांनी स्वतःच्या वक्तव्यशैलीवर मिश्कील भाष्य केले. माझ्या तोंडून काहीही निघते आणि ते बोलले जाते, त्यानंतर टीव्हीवाले काहीही दाखवतात, त्यामुळे आता आपण सांभाळून बोलतो, असे त्यांनी विनोदी अंदाजात सांगितले. मात्र, त्याआधीच त्यांनी केलेल्या विधानाची राजकीय चर्चा सुरू झाली होती.
याच कार्यक्रमात त्यांनी जिल्हा बँकेच्या कारभाराचाही उल्लेख केला. व्यासपीठावर उपस्थित जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार (Sanjay Pawar) यांना त्यांनी बँकेवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला. लक्ष दिले नाही तर बँक उचकून जाईल, असा खोचक इशाराही त्यांनी दिला. दूध संघ किंवा सहकारी संस्थांमध्ये यापूर्वी अध्यक्ष आणि सभापती राहिलेल्या व्यक्तींच्या स्वभावाचा संदर्भ देताना पाटील यांनी ‘भोळेपणा’ या मुद्द्यावर भाष्य केले. जळगाव जिल्हा दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी गृहमंत्री जे. टी. महाजन यांच्या पुतळ्याच्या उद्घाटन सोहळ्यात गुलाबराव पाटील बोलत होते. याच कार्यक्रमात त्यांनी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या कामाचे कौतुकही केले. मुंढे यांच्यासारखे अधिकारी आल्यानंतर दूध संघात येणाऱ्या दुधाचे प्रमाण वाढले आणि पनीरची उपलब्धताही सुधारली, असे पाटील यांनी सांगितले.






