Konkan Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी यंदाही विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे. शिवसेना आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ‘शिवसेना एक्सप्रेस’ची घोषणा केली असून या गाडीतून भाविकांना मोफत प्रवास करता येणार आहे. मुंबईतील दादर रेल्वे स्थानकातून 12 सप्टेंबरला ही विशेष गाडी कुडाळच्या दिशेने रवाना होणार आहे. यामुळे गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
12 सप्टेंबरला दादरहून कुडाळकडे रवाना :
कोकणातील गणेशोत्सवाला विशेष महत्त्व असून या सणासाठी मुंबईसह देश-विदेशात राहणारे अनेक कोकणवासी दरवर्षी आपल्या गावाकडे परततात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि कोकणदरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडूनही विशेष गाड्यांची व्यवस्था केली जाते. कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त थांबे देण्याची मागणीही करण्यात आली होती आणि ती रेल्वे प्रशासनाने मान्य केली आहे.
दरवर्षीच्या उपक्रमाप्रमाणे यंदाही मुंबईहून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी ‘शिवसेना एक्सप्रेस’ची व्यवस्था करण्यात आली आहे. निलेश राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर, शनिवारी सकाळी 10 वाजता ही विशेष गणपती रेल्वे दादर रेल्वे स्थानकातून सुटेल आणि कुडाळ रेल्वे स्थानकापर्यंत धावेल. कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांना या गाडीचा लाभ घेता येणार आहे.
Konkan Ganeshotsav | मोफत प्रवास, सरकारी ओळखपत्र बंधनकारक :
या विशेष रेल्वेतील जागा आरक्षित करण्यासाठी निलेश राणे यांच्या कार्यालयाकडून संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोकणात जाणाऱ्या भाविकांना सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल. सीट बुकिंगसंदर्भातील आवश्यक माहिती कार्यालयाकडून संबंधित प्रवाशांना देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करणाऱ्या भाविकांनी दिलेल्या वेळेत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेना एक्सप्रेसमधून होणारा प्रवास पूर्णपणे विनामूल्य असणार आहे. या प्रवासासाठी कोणत्याही व्यक्तीला पैसे किंवा अन्य मोबदला देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वेचे बुकिंग अहस्तांतरणीय असल्यामुळे एका व्यक्तीच्या नावावर झालेले आरक्षण दुसऱ्या प्रवाशाला वापरता येणार नाही. प्रवास करताना सरकारी ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, कोकणात जाऊन कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी दरवर्षी हा छोटासा प्रयत्न केला जातो. यंदाही भाविकांना संपूर्ण प्रवास मोफत करण्याची संधी मिळणार आहे.






