Nagpur violence | नागपूरच्या महाल (Mahal) भागात सोमवारी रात्री उसळलेल्या हिंसाचारानंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीच्या मुद्यावरून दोन गटांमध्ये तीव्र संघर्ष झाला. या हिंसाचारात वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांनी परिस्थिती अधिकच बिघडली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत कोम्बिंग ऑपरेशन राबवले आणि 50 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. (Nagpur violence)
मुख्यमंत्री फडणवीस यांचा कडक इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूरच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नागपूर पोलीस आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, दंगल करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी. “पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही,” असेही त्यांनी ठणकावले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, “नागपूर शहर हे सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये. मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कायदा-सुव्यवस्थेचे पालन करणे सर्वांसाठी अनिवार्य आहे.”
10 पोलीस आणि अग्निशमन दलाचे 4 जवान जखमी
सोमवारी रात्री झालेल्या या हिंसाचारात 8 ते 10 पोलीस जखमी झाले आहेत. याशिवाय, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या चार जवानांनाही मारहाण करण्यात आली. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना अश्रुधूर आणि लाठीचार्ज करावा लागला.
यानंतर महानगरात महाल भागासह संवेदनशील भागांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल झालेल्या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत हिंसाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले.
नागपूर शहरात कलम 144 लागू
हिंसाचारानंतर पोलिसांनी नागपूरमध्ये कलम 144 लागू केले आहे. नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके (Pravin Datke) यांनी बाहेरून आलेल्या समाजकंटकांनीच ही आग भडकवल्याचा आरोप केला आहे. (Nagpur violence)
सोमवारी रात्री समाजकंटकांनी शहरात मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांची नासधूस करण्यात आली. काही जणांनी रस्त्यावर असलेल्या जेसीबीला आग लावली, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सध्या नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
Title : Nagpur Violence CM Fadnavis Orders Strict Action Against Rioters






