हिंसाचारानंतर नागपुरात तणावपूर्ण शांतता, ‘या’ भागांत संचारबंदी लागू

On: March 18, 2025 8:03 AM
Nagpur Violence 80 Arrested Curfew Imposed
---Advertisement---

Nagpur violence | नागपूरच्या महाल (Mahal) परिसरात सोमवारी रात्री उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवत 80 जणांना अटक करण्यात आली आहे. आजही इथे तणावपूर्ण परिस्थिती असून, महालसह अनेक भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या 55 अकाउंट्सवर पोलिसांची करडी नजर आहे. (Nagpur violence)

हिंसाचारानंतर तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा कडक बंदोबस्त

सोमवारी नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव कायम आहे. दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. यानंतर पोलिसांनी अनेक परिसरात संचारबंदी लागू केली.

महानगरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर या भागांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या भागांमध्ये पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सोशल मीडियावर पोलिसांची नजर, 55 अकाउंट्स रडारवर

हिंसाचारानंतर नागपूर पोलिसांनी सायबर तपास सुरू केला असून, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवणाऱ्या 55 अकाउंट्सवर कारवाईची तयारी सुरू आहे. जवळपास 1800 अकाउंट्सची तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

सोमवारी रात्री शहरातील इंटरनेट आणि वीज सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली होती. हिंसाचार नियंत्रणात आल्यानंतरही पोलिसांची गस्त सुरू असून, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज सकाळी 10 वाजता नागपूरचा दौरा करणार आहेत. ते महाल परिसराची पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.

नेमकं काय घडलं?

सोमवारी सकाळी नागपूरच्या गणेशपेठ आणि महाल परिसरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दल (Bajrang Dal) यांनी औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीच्या हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी औरंगजेबाचा फोटो आणि हिरव्या कापडात लपेटलेली प्रतीकात्मक कबर जाळली. (Nagpur violence)

संध्याकाळी 7.30 वाजता गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भालदारपुरा येथे 80 ते 100 लोकांचा जमाव एकत्र आला आणि पोलिसांवर दगडफेक केली. या हल्ल्यात एका पोलिस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आला, त्यामुळे त्यांचा हात गंभीर जखमी झाला आहे. तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली आणि काही ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आली.

शहरातील कोणत्या भागांमध्ये संचारबंदी?

गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर या भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वैद्यकीय कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Title : Nagpur Violence 80 Arrested Curfew Imposed in Several Areas

 

Join WhatsApp Group

Join Now