Nagpur Bar Files Video | नागपूरच्या मनीष नगर भागातील एका बियर बारमध्ये प्रशासनाचा खाक्या दिसून आला आहे. सुट्टीच्या दिवशी दुपारी बारमध्ये बसून तीन व्यक्तींनी शासकीय फायलींचा गठ्ठा उघडून, दारूच्या घोटांसोबत त्या फायलींवर सह्या केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
दारू आणि प्रशासनाचा संगम? :
प्रसिद्ध बीअर बारमध्ये दुपारी 3.30 च्या सुमारास आलेल्या तिघांनी टेबलवर सरकारी फायलींचा गठ्ठा ठेवत बारमध्येच ‘शासन कारभार’ सुरू केला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की, यातील एकजण दारूचे घोट घेत फायलींवर सह्या करताना दिसतो आहे.
या प्रकारामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झालेत – हे अधिकारी कोण होते? कोणत्या विभागाशी संबंधित होते? आणि बारमध्ये नेमकं कोणत्या महत्वाच्या फायलींची पडताळणी सुरू होती? याची चौकशी होणे गरजेचे आहे. (Nagpur Bar Files Video)
Nagpur Bar Files Video | CCTV तपासणीची गरज :
सदर बारमध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे पोलिसांनी जर इच्छाशक्ती दाखवली, तर व्हिडिओ आणि फुटेजच्या आधारे या ‘शासकीय’ बिअर सेशनमधील कर्मचाऱ्यांची ओळख पटवणं सहज शक्य आहे.
या व्हिडिओमुळे संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सामान्य नागरिक ज्या यंत्रणेकडून जबाबदारीची अपेक्षा करतो, तीच यंत्रणा सुट्टीच्या दिवशी बारमध्ये प्रशासन चालवत असेल, तर लोकांचा विश्वास कसा राहील? सोशल मीडियावर यावर जोरदार टीका सुरू असून, ‘शासन बारमध्ये?’ असा सवाल अनेक नेटिझन्स विचारत आहेत.






