Mumbai Mayor Election | राज्यातील महानगरपालिका निवडणुकांनंतर आता सर्वाधिक लक्ष मुंबई महापालिकेच्या महापौरपदाकडे लागले आहे. मुंबईसारख्या देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावी महापालिकेचा कारभार कोणाच्या हाती जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, येत्या 11 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या नव्या महापौरपदासाठी मतदान होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या निवडीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असून, राजकीय पातळीवरही हालचालींना वेग आला आहे.
या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून भाजप (BJP) हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक युतीनंतरही मुंबई महापालिकेवर भाजपचं वर्चस्व कायम राहिलं आहे. त्यामुळे महापौरपद कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. आता 11 फेब्रुवारीला मतदान होणार असल्याने मुंबईकरांना लवकरच नवा महापौर मिळणार आहे.
6 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया, 11 तारखेला मतदान :
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या महापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर सर्व नियमांची पूर्तता करत 11 फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी मतदान होईल. त्याच दिवशी निकाल जाहीर होऊन मुंबईला नवा महापौर मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (Mumbai Mayor Election)
दरम्यान, निवडणूक निकालानंतर संभाव्य घोडेबाजार टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते. हा निर्णय राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असल्यामुळे महापौरपदाबाबत अंतिम चर्चा काही काळ रखडली होती. मात्र, फडणवीस मुंबईत परतल्यानंतर भाजप आणि शिंदे गटामध्ये बैठका झाल्या असून, त्यातून महापौर निवडीचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे.
Mumbai Mayor Election | महायुतीत समन्वय, भाजपचा महापौर जवळपास निश्चित? :
मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीतील अंतर्गत समन्वयानुसार ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांवर शिंदे गटाचा प्रभाव राहणार असून, मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. (Mumbai Mayor Election)
तसेच मुंबई महापालिकेच्या कारभारावर देशभराचं लक्ष असतं. अर्थसंकल्प, पायाभूत सुविधा, पावसाळी नियोजन, आरोग्य सेवा आणि नागरी सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर महापौराची भूमिका निर्णायक असते. त्यामुळे या निवडीला केवळ राजकीय नव्हे, तर प्रशासकीय दृष्टिकोनातूनही मोठं महत्त्व आहे. 11 फेब्रुवारीच्या मतदानानंतर मुंबईच्या नव्या नेतृत्वाचं चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर आगामी पाच वर्षांच्या कारभाराची दिशा ठरणार आहे.






