‘या’ तारखेपासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल; गणेशोत्सवासाठी मोठा निर्णय

On: August 19, 2025 5:49 PM
Latur–Kalyan Highway
---Advertisement---

Mumbai-Goa Highway | गणेशोत्सवासाठी कोकण सज्ज झाला असून मुंबई-गोवा महामार्गावरून गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी दिलासादायक बातमी आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने या काळात प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी विशेष तयारी केली आहे. 23 ऑगस्टपासून 16 टनांपेक्षा जास्त वजनाच्या अवजड वाहनांना या महामार्गावरून प्रवेशबंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Mumbai-Goa Highway)

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत ही माहिती दिली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रवासादरम्यान होणारी गैरसोय आणि अपघातांचा धोका कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अवजड वाहनांसाठी प्रवेशबंदीचे वेळापत्रक :

मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवाच्या काळात तीन टप्प्यांत ही बंदी लागू राहणार आहे.

23 ऑगस्ट सायं. 6 ते 29 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत

2 सप्टेंबर सकाळी 8 ते 4 सप्टेंबर रात्री 8 वाजेपर्यंत

6 सप्टेंबर सकाळी 8 ते 8 सप्टेंबर रात्री 8 वाजेपर्यंत

या कालावधीत प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महामार्गावरील वाहतूक नियंत्रणात ठेवली जाणार आहे.

Mumbai-Goa Highway | गणेशभक्तांसाठी विशेष सुविधा व सुरक्षा व्यवस्था :

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून महामार्गावर पोलीस मदत कक्ष, आपत्कालीन टोइंग व्हॅन, क्रेन आणि दुरुस्ती सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत अॅम्ब्युलन्स व मोफत उपचार मिळतील. तसेच प्रवाशांसाठी पाणी, चहा, बिस्किटे आणि ओआरएसची सोय तर महिलांसाठी खास फीडिंग कक्षाची व्यवस्था केली आहे. (Mumbai-Goa Highway)

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस, होमगार्ड, एसआरपीएफ यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एटीबी आणि एटीसीची पथके तैनात करण्यात आली असून सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेलही सज्ज आहे.

महामार्गावर आंदोलन आणि प्रशासनाची डोकेदुखी :

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून जनआक्रोश समितीने यंदा महामार्गावरच गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची सुरुवात पळस्पे फाटा येथून झाली असून 27 ऑगस्ट रोजी लांजा येथून मुख्य यात्रेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे प्रशासनासमोर वाहतूक व्यवस्थापन आणि उत्सवाचा उत्साह या दोन्हींचा समतोल राखण्याचे आव्हान उभे राहणार आहे. (Mumbai-Goa Highway Traffic Change)

गणेशोत्सवाच्या काळात लाखो भाविक मुंबईतून कोकणात निघतात. अशा वेळी महामार्गावरील अवजड वाहनांवर बंदी घातल्याने वाहतुकीत गती येणार आहे आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे गणेशोत्सव काळात कोकणातील वातावरण आणखी आनंदी आणि सुरळीत राहील अशी अपेक्षा आहे.

News Title: Mumbai-Goa Highway Traffic Changes for Ganeshotsav 2025 | Heavy Vehicles Banned, Special Facilities for Devotees

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now