Mumbai | मुंबई शहराने यंदाच्या मे महिन्यात २०२१ नंतरचा सर्वाधिक पाऊस नोंदवला असून, आगामी आठवड्यातही मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. आधीच ठाण्या-वाऱ्यांनी आणि वीजांच्या कडकडाटाने मुंबईकरांचा अनुभव थरारक झाला असताना, आणखी चार दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह कोकणात यलो अलर्ट-
भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई आणि कोकण विभागात यलो अलर्ट तर रायगड, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुसळधार पावसाबरोबर वादळी वारे आणि विजा चमकण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईने यंदाच्या मे महिन्यात ८५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे ८ मे रोजी शहराने १९५१ नंतरचा सर्वात थंड मे महिना अनुभवला.
मान्सून केरळमध्ये २८ मेपूर्वी-
IMDच्या मते, केरळमध्ये मान्सून यावर्षी २८ मेपूर्वीच दाखल होण्याची शक्यता आहे, जे नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर आहे. केरळमध्ये मान्सून आल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रात त्याचे आगमन साधारणतः ८ ते १० दिवसांनंतर होते. त्यामुळे मुंबईत (Mumbai) मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यातच दाखल होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
IMD मुंबईच्या संचालक शुभांगी भुते यांनी सांगितले की, १३ मेपासून मुंबईत (Mumbai) मान्सूनपूर्व सरी सुरू झाल्या आहेत. तसेच, सध्या एल निनो आणि इंडियन ओशन डायपोल (IOD) या दोन्ही स्थिती ‘न्यूट्रल’ असल्याने यंदा मान्सून चांगल्या प्रमाणात सक्रिय राहण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रशासन सज्ज-
पुढील चार दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी वीजांच्या गडगडाटात घराबाहेर जाणे टाळावे, इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहावे आणि गरज असल्यास अधिकृत संकेतस्थळांवरून अपडेट्स घेत राहावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






