मुंबईकरांनो काळजी घ्या, हवामानाबाबत IMD कडून महत्त्वाची अपडेट समोर!

On: January 28, 2025 1:32 PM
Mumbai News
---Advertisement---

Mumbai News | मुंबईमध्ये तापमानाचा पारा किंचित चढू लागलेला असला, तरी थंडीचा मोसम मात्र संपलेला नाही. पश्चिमी प्रकोपामुळे वातावरणात काही ठिकाणी आर्द्रता असून याचा परिणाम मुंबईच्या प्रदूषणावरही झालेला दिसतो.

सोमवारी मुंबईमध्ये देवनार येथील हवेची गुणवत्ता ‘समीर’ या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ॲपवरील नोंदीनुसार ‘वाईट’ श्रेणीत होती. इतर काही भागांमध्येही हवेची गुणवत्ता खालावल्याची नोंद झाली. माझगाव येथे गुणवत्ता निर्देशांक 193 नोंदला गेला.

मुंबईत धुरक्याचे वातावरण-

मुंबईच्या (Mumbai) हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक सोमवारी रात्रीच्या सुमारास 147 नोंदला गेला. हवेच्या गुणवत्तेची एकूण श्रेणी ‘मध्यम’ असली, तरी मुंबईमध्ये सोमवारी दिवसभर धुरक्याचे वातावरण होते. बोरिवली पूर्वेला भारतीय उष्णकटिबंधीय हवामान विज्ञान संस्थेच्या केंद्रावर 165 तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या केंद्रावर 95 निर्देशांक नोंदला गेला.

राज्यात थंडीचा प्रभाव-

राज्यात पुढील 10 ते 12 दिवस किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होऊन त्यानंतर थंडी कमी होण्याची शक्यता आहे. पश्चिमी प्रकोपांमुळे फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता आहे. या काळात लातूर, बीड, सोलापूर जिल्ह्यात किरकोळ पाऊस पडू शकतो, अशी माहिती निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. याचा अर्थ, मुंबईकरांना (Mumbai) अद्याप थंडीपासून पूर्णपणे सुटका मिळणार नाही आणि धुरक्याचा त्रासही सहन करावा लागेल.

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्वे-

या पार्श्वभूमीवर, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शक तत्वे आणि प्रमाणित कार्यपद्धती यापूर्वीच लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये बांधकामांशी संबंधित बाबींचा देखील समावेश आहे. आता महानगरपालिका प्रशासनाने त्याहीपुढे जाऊन वायू प्रदुषणासाठी कारणीभूत ठरत असलेल्या छोट्यामोठ्या घटकांवरही अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या रस्त्याच्या खोदकामाच्या मनाई आदेशामुळे रिअल इस्टेट विकासक नाराज झाले आहेत. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही कृती स्वागतार्ह आहे परंतु मुंबईच्या खराब हवेच्या गुणवत्तेवर हा काही दीर्घकालीन उपाय नाही, असे शहरातील पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

News Title : Mumbai Air Quality deteriorates due to Smog,

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now