राज्यात खळबळ! MPSC परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा; नेमके काय घडले?

On: July 27, 2026 12:00 PM
MPSC
---Advertisement---

MPSC | NEET आणि TET पेपरफुटीच्या घटनांनंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अहिल्यानगरमधील ऋषिकेश गांगर्डे यांनी या परीक्षेची प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष परीक्षेच्या दोन दिवस आधी काही उमेदवारांकडे पोहोचल्याचा गंभीर आरोप केला आहे. व्हॉट्सअॅपवर प्रश्नांसह संभाव्य उत्तरे पाठवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

MPSC परीक्षेपूर्वी प्रश्न-उत्तरे मिळाल्याचा दावा :

नीट (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणामुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. पेपरफुटीच्या निषेधार्थ देशभर आंदोलने झाली होती. कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलकांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करत या मुद्द्याला मोठ्या प्रमाणात वाचा फोडली होती. त्यानंतर काही आठवड्यांपूर्वी ठाण्यात टीईटी (TET) परीक्षेचा पेपर फुटल्याचेही समोर आले होते. या प्रकरणात बिहारमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर आता अहिल्यानगरचे ऋषिकेश गांगर्डे यांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत गंभीर दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधीच काही उमेदवारांना प्रश्न आणि त्यांची संभाव्य उत्तरे व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आली होती. या आरोपाची चौकशी करून दोषी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच पोलिसांनी आपली तक्रार स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोपही गांगर्डे यांनी केला आहे.

MPSC | 22 मार्चच्या परीक्षेबाबत तक्रार :

गांगर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 22 मार्च 2026 रोजी क्लास-2 श्रेणीतील औषध निरीक्षक पदासाठी परीक्षा घेतली होती. मात्र, या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 20 मार्चलाच काही उमेदवारांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मिळाले होते, असा त्यांचा आरोप आहे. या चॅटमध्ये उमेदवारांना 78 ते 80 प्रश्न सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्यातील उर्वरित 10 ते 12 प्रश्न मुद्दाम चुकीचे लिहिण्यास सांगितल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

त्यांच्या आरोपानुसार, 200 पैकी तब्बल 90 प्रश्न पर्यायांसह अचूक स्वरूपात आधीच उपलब्ध झाले होते. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी आपण पोलिसांकडे गेलो होतो; मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला, असा दावा गांगर्डे यांनी केला. त्याआधी एमपीएससी आयोग तसेच एडीएच्या मुख्य कार्यालयात जाऊनही तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आता सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कोण आहेत, हे समोर आणावे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कथित पेपरफुटीतील आरोपींना अटक करण्याची मागणीही गांगर्डे यांनी केली आहे.

News Title: MPSC Drug Inspector Paper Leak Claim

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now