MP News| चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या पती-पत्नीच्या नात्यात इतका कटुतेचा व अत्याचाराचा भाग निर्माण होईल, हे कोणीही अपेक्षित केलं नसेल. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सतनामधील सिंधी कॅम्प येथे राहणाऱ्या एका तरुणाला त्याच्याच पत्नीने खोलीत बंद करून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
खोलीत बंद करून पतीला अमानुष मारहाण
पती-पत्नीमधील वाद इतका टोकाला गेला की पत्नीने पतीला खोलीत कोंडून जमिनीवर पाडत मारहाण केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. मारहाणीदरम्यान पती आपल्या आईला वाचवण्याची याचना करताना दिसत आहे. आईने हस्तक्षेप करत सुनेला खोलीबाहेर फेकून दिलं आणि तिची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यानंतर पत्नीने स्वतःच्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला.
या संपूर्ण घटनेचा पतीने स्वतः व्हिडिओ शूट केला होता. त्यामध्ये तो म्हणताना दिसतो की, “तू मला मारायला सुरुवात करतेस म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे.” पत्नी मात्र यावर आक्रमक होत फोन हिसकावण्याचा प्रयत्न करत होती. ती म्हणते, “मी तुला मारणार नाही, व्हिडिओ थांबवा.” तरीही ती सतत फोन काढण्याचा प्रयत्न करत होती आणि तिने त्या तरुणाला धक्काबुक्की करत गळा दाबला व कानशिलात मारलं. तरुण त्यावेळी म्हणतो, “मला तुझी खूप भीती वाटते.”
कमरा बंद कर पत्नी ने पति को पीटा
मध्यप्रदेश के सतना में पत्नी ने पति को कमरा बंद कर पीटा, 4 साल पहले हुई थी दोनों की लव मैरिज#MadhyaPradesh | #HusbandAndWife | #viralvideo pic.twitter.com/nuIFDINglH
— SACH TALKS (@SachTalks) March 25, 2025
प्रेमविवाहानंतर सुरु झाला अत्याचाराचा काळ
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण आणि त्याच्या पत्नीचा चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला नातं सुरळीत होतं, मात्र काही काळाने वादाला सुरुवात झाली. पत्नीने त्याच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. पतीने नकार दिल्यानंतर ती त्याला दररोज मारहाण करू लागली. पीडित तरुणाने सांगितले की, 25 ऑक्टोबर रोजी त्याला विशेषतः अमानुष मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ त्याने 25 मार्चला इंस्टाग्रामवर शेअर केला.






