Monsoon Travel Tips | पावसाळा म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद लुटण्याचा काळ. धबधबे, नद्या, तलाव हे ठिकाणं पर्यटकांना भुरळ घालतात. मात्र याच वेळी अपघातांचीही शक्यता वाढते. कुंडमळा (पुणे) येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून चार पर्यटकांचा मृत्यू झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात निसर्गरम्य स्थळी जाण्याआधी आवश्यक खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (Monsoon Travel Tips)
धबधब्याला जाण्यापूर्वी काय तपासाल? :
धबधबा किंवा पाण्याच्या ठिकाणी जाण्यापूर्वी त्या भागाची सविस्तर माहिती मिळवा. स्थानिक लोकांकडून किंवा अधिकृत यंत्रणांकडून हवामानाचा अंदाज, पाण्याचा प्रवाह, सुरक्षा उपाययोजना याची खात्री करा. त्या परिसरात एखादी धोक्याची सूचना किंवा बंदी असल्यास ती पाळा. पावसामुळे प्रवाह अचानक वाढू शकतो, जमीन निसरडी होऊ शकते यामुळे धोका दुपटीने वाढतो.
धबधब्याच्या ठिकाणी जाताना शक्यतो एखाद्या माहितीगार व्यक्तीला सोबत घ्या. पाण्याची खोली किती आहे, प्रवाह किती जोरदार आहे हे पाहूनच पाण्यात उतरा. पोहण्याचा अनुभव नसेल किंवा खोली जास्त असेल, तर पाण्यात जाणे टाळा. आपत्कालीन क्रमांक जवळ ठेवा. पाण्यात अडकलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी CPR आणि प्राथमिक उपचारांची माहिती असणे फायद्याचे ठरते. (Monsoon Travel Tips)
Monsoon Travel Tips | काही महत्त्वाच्या सुरक्षात्मक टिप्स:
– शक्यतो लाकडी काठी सोबत ठेवा – पायाखाली असलेली जमीन किती सखल आहे हे समजायला मदत होते.
– आवश्यक औषधे, रेनकोट, सुटसुटीत कपडे सोबत ठेवा.
– स्थानिक प्रशासन, पोलीस किंवा वन विभागाने दिलेल्या सूचना नक्की पाळा.
– जर कोणी इशारा दिला की “आत जाणं धोकादायक आहे”, तर तिथे जाणं पूर्णपणे टाळा. (Monsoon Travel Tips)
दरम्यान, प्रत्येक सहलीमागे आनंद असतो, पण तो आनंद अपघाताच्या सावटाखाली नको. निसर्गाच्या सानिध्यात राहा, पण त्याचा राग ओढवू नये म्हणून काळजीपूर्वक वागा. धबधबे सुंदर असले, तरी ते हसत खेळत प्राण घेऊ शकतात हे लक्षात ठेवा.






