Mobile Recharge Price Hike | देशातील टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा आता ग्राहकांना स्वस्त सेवा देण्याऐवजी दरवाढीकडे वळली आहे. एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया या तीन प्रमुख कंपन्या पुन्हा एकदा रिचार्ज दर वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आधीच महागाईच्या चक्रात अडकलेल्या सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर आणखी ताण येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून या कंपन्या दरवर्षी सुमारे 20 टक्क्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवत आहेत. यावर्षीही त्याच पद्धतीने दर वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामध्ये विशेषतः मध्यम ते उच्च श्रेणीतील प्लॅन (₹300 पेक्षा जास्त किंमत असलेले) महाग होण्याची शक्यता आहे, तर स्वस्त प्लॅनच्या किमतीत मोठा बदल होणार नाही असे दिसते. कारण, कमी किमतीचे प्लॅन महाग केल्यास ग्राहक दुसऱ्या कंपनीकडे नंबर पोर्ट करण्याची शक्यता वाढते. (Mobile Recharge Price Hike)
वर्षाअखेरीस 10-12% दरवाढीची शक्यता:
ईटी टेलिकॉमच्या अहवालानुसार, डिसेंबर 2025 पर्यंत जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया मोबाईल टॅरिफमध्ये 10 ते 12 टक्के वाढ करू शकतात. जरी कंपन्यांकडून यावर कोणतेही अधिकृत विधान आलेले नसले तरी, युजर्समध्ये दरवाढीबाबत चिंता वाढत आहे. विशेषतः दोन सिम वापरणाऱ्या ग्राहकांना जास्त आर्थिक फटका बसणार आहे.
गेल्या वर्षी जुलै 2024 मध्ये या तिन्ही कंपन्यांनी 11% ते 23% इतकी मोठी दरवाढ केली होती. जर यावर्षीही 12% दरवाढ झाली, तर ₹100 चा प्लॅन ₹112 ला मिळेल. ही वाढ लहान वाटली तरी, वारंवार रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांच्या वार्षिक खर्चात मोठी भर पडणार आहे.
Mobile Recharge Price Hike | वाढत्या युजर संख्येमुळे कंपन्यांचा महसूल वाढला :
मे 2025 मध्ये टेलिकॉम क्षेत्रात अॅक्टिव्ह युजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. केवळ मे महिन्यात 74 लाख नवीन अॅक्टिव्ह युजर्स नेटवर्कमध्ये जोडले गेले. गेल्या 29 महिन्यांतील ही सर्वात जलद वाढ आहे. सध्या देशातील एकूण अॅक्टिव्ह मोबाईल युजर्सची संख्या 1.08 अब्जपर्यंत पोहोचली आहे. (Mobile Recharge Price Hike)
तज्ज्ञांच्या मते, युजर बेस वाढल्याने कंपन्यांना महसूल मिळवण्यासाठी स्वस्त प्लॅनपेक्षा मध्यम आणि उच्च श्रेणीतील प्लॅनवर दरवाढ करणे फायदेशीर ठरते. त्यातूनच ऑपरेशनल खर्च, 5G नेटवर्क विस्तार आणि स्पेक्ट्रम फी यांचा भार उचलला जातो.






