SBI Recruitment | देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आर्थिक वर्ष 2026-27 साठी विस्ताराची मोठी योजना आखली आहे. या काळात बँकेकडून सुमारे 11 हजार ते 12 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर देशभरात 200 ते 250 नवीन शाखा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधींकडे तरुणांचे लक्ष लागले आहे.
भरतीत अधिकारी आणि लिपिकांना संधी :
स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष सी. एस. सेट्टी यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये होणारी कर्मचारी भरती प्रामुख्याने लिपिक आणि अधिकारी पदांसाठी असेल. मागील आर्थिक वर्षात तंत्रज्ञानाशी संबंधित मोठ्या प्रमाणातील नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत यंदाची भरती संख्या कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची निवृत्ती तसेच भविष्यातील मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन अंतिम संख्या निश्चित केली जाणार आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एसबीआयने एकूण 25,633 कर्मचाऱ्यांना नियुक्त केले होते. यामध्ये 4,640 अधिकारी, 19,340 सहयोगी आणि 1,653 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. याशिवाय बँकेने सुमारे 1,500 विशेष आयटी अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली होती. यंदा मात्र अशा मोठ्या तंत्रज्ञान-केंद्रित भरतीची आवश्यकता नसल्याचे एसबीआयच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. मार्च 2026 अखेर बँकेतील एकूण कर्मचारी संख्या 2.45 लाखांपेक्षा अधिक झाली होती. त्यामुळे एसबीआय देशातील मोठ्या औपचारिक क्षेत्रातील रोजगार देणाऱ्या संस्थांपैकी एक आहे.
SBI Recruitment | नव्या शाखांसह नेटवर्कचा विस्तार :
कर्मचारी वाढवतानाच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखांचे जाळेही मजबूत करण्याच्या तयारीत आहे. देशभरात बँकेच्या मोठ्या प्रमाणावर शाखा असल्या तरी वेगाने विकसित होणारी व्यावसायिक केंद्रे आणि नवीन निवासी भागांमध्ये अजूनही पुरेशा बँकिंग सुविधा उपलब्ध नसल्याचे बँकेच्या लक्षात आले आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी नवीन शाखा सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे.
दरवर्षी सुमारे 200 ते 250 निव्वळ नवीन शाखा सुरू करण्याचे एसबीआयचे नियोजन आहे. मात्र, विस्तार करताना केवळ शाखांची संख्या वाढवण्याऐवजी त्यांच्या कार्यक्षमतेकडेही लक्ष दिले जाणार आहे. कमी कामकाज असलेल्या शाखांचे एकत्रीकरण आणि तर्कसंगतीकरण केले जाईल. ग्राहकांच्या वाढत्या गरजा आणि बदलत्या व्यावसायिक क्षेत्रांचा विचार करून बँकेचे शाखा नेटवर्क अधिक परिणामकारक करण्याचा हा प्रयत्न आहे.







