Raj Thackeray | राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे जोरात वाहत असून प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. येत्या 15 जानेवारीला 29 महापालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. अशा निर्णायक टप्प्यावर सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या एका बड्या नेत्याने भाजपात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने मिळवलेल्या यशानंतर भाजप आता महापालिका निवडणुकांसाठीही आक्रमक रणनीती राबवत असल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षांतील प्रभावी नेत्यांना आपल्या गळाला लावण्याचा हा डाव मानला जात असून, त्याचाच फटका आता थेट राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेला बसला आहे.
मनसेच्या विभाग अध्यक्षाचा भाजपात प्रवेश :
मीरा-भाईंदर परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष श्रीजीत मोहन (Shrijeet Mohan) यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. श्रीजीत मोहन हे स्थानिक पातळीवर ओळखीचे आणि सक्रिय नेते मानले जातात. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे मनसेच्या संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. या प्रवेशावेळी स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते.
श्रीजीत मोहन यांच्यासोबत तब्बल 70 कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केल्याने या घटनेचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपासाठी ताकद वाढवणारा, तर मनसेसाठी डोकेदुखी ठरणारा असल्याचे चित्र आहे.
Raj Thackeray | मीरा-भाईंदरमध्ये बदलणार राजकीय गणित? :
मीरा-भाईंदरमध्ये मनसेचे संघटन आधीच मर्यादित मानले जात होते. अशा परिस्थितीत विभाग अध्यक्षासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाल्याने मनसेची स्थिती आणखी कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऐन महापालिका निवडणुकीत मनसेला आता नव्याने संघटन बांधणी करावी लागणार असून, तोपर्यंत भाजपाला या भागात मोठा फायदा होऊ शकतो.
श्रीजीत मोहन यांना असलेला स्थानिक जनाधार लक्षात घेता, त्यांच्या जाण्याचा थेट परिणाम निवडणूक निकालांवर होऊ शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. मनसेकडून आता या धक्क्यानंतर कोणती रणनीती आखली जाते, नवीन जबाबदाऱ्या कोणाकडे दिल्या जातात आणि राज ठाकरे या घडामोडीवर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपाने टाकलेल्या या राजकीय डावामुळे मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीचे गणित बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.






