पुणे जिल्ह्याचा कौल कुणाला? पाहा काका-पुतण्यांच्या संघर्षात कोण ठरलं सरस?

On: December 21, 2025 5:05 PM
Ajit Pawar vs Sharad Pawar
---Advertisement---

Ajit Pawar vs Sharad Pawar | राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना राजकीय समीकरणे स्पष्ट होत आहेत. या निकालांमध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतली असून राज्यभरात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. (Pune Election Result)

याचे मुख्य कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील काका-पुतण्या संघर्ष. शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटांमध्ये थेट लढत पाहायला मिळाली. मात्र निकाल जाहीर होताच पुणे जिल्ह्यात अजित पवार गटाची सरशी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील 17 पैकी तब्बल 10 नगराध्यक्षपदांवर अजित पवार समर्थित उमेदवारांनी विजय मिळवला असून शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

अजित पवारांचा बालेकिल्ला पुन्हा मजबूत :

पुणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही हे चित्र कायम राहिले आहे. जिल्ह्यातील बहुतांश नगरपरिषदांमध्ये अजित पवार गटाचे वर्चस्व दिसून आले आहे. 17 पैकी 10 नगराध्यक्षपदे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी जिंकली आहेत.

याशिवाय भाजप-राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून एका नगराध्यक्षपदावर विजय मिळवण्यात आला आहे. भाजपचे चार तर शिवसेनेचे चार नगराध्यक्ष निवडून आले आहेत. विशेष बाब म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला पुणे जिल्ह्यात एकही नगराध्यक्षपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे काका-पुतण्या संघर्षात पुणे जिल्ह्यात पुतण्याने बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Ajit Pawar vs Sharad Pawar | विजयी नगराध्यक्षांची यादी आणि बारामतीत जल्लोष :

अजित पवार गटाच्या विजयी नगराध्यक्षांमध्ये शिरूरमधून ऐश्वर्या अभिजीत पाचरणे, लोणावळ्यातून राजेंद्र बबन सोनवणे, वडगाव मावळमधून अबोली मयूर ठोरे, भोरमधून रामचंद्र श्रीपती आवारे, तळेगाव दाभाडेतून संतोष हरिभाऊ दाभाडे, इंदापूरमधून भरत सुरेश शहा, जेजुरीतून जयदीप दिलीप बारभाई, दौंडमधून दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे, फुरसुंगीमधून संतोष फकिरा सरोदे आणि माळेगाव बुद्रुकमधून सुयोग शामराव सातपुते यांचा समावेश आहे. (Ajit Pawar vs Sharad Pawar)

शिवसेनेचे नगराध्यक्ष मंचर, राजगुरुनगर, जुन्नर आणि चाकण येथे निवडून आले आहेत. भाजपने आळंदी आणि सासवड येथे नगराध्यक्षपदे जिंकली आहेत. दरम्यान, बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पहिल्याच फेरीत आघाडी घेतल्याने समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला. या निकालांमुळे पुणे जिल्ह्यात अजित पवार गटाची राजकीय पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

News Title: Ajit Pawar Dominates Pune Local Body Elections, Sharad Pawar Camp Suffers Major Setback

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now