Nagar Panchayat Election Result | राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी आनंदाऐवजी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बहुतेक ठिकाणी निकाल शांततेत स्वीकारले गेले असले तरी काही शहरांमध्ये मात्र विजय-पराभवाच्या नाराजीमधून थेट वाद, हाणामारी आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना तत्काळ हस्तक्षेप करावा लागला. (Nagar Panchayat Election Result)
या निवडणुकांमध्ये एकूण 288 नगराध्यक्षपदांसाठी मतदान झाले होते. त्यापैकी बहुसंख्य जागांवर महायुतीने विजय मिळवला असला, तरी निकालानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण घटनांनी प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. काही ठिकाणी मतमोजणी पूर्ण होताच समर्थकांमध्ये शाब्दिक वाद झाले आणि त्याचे रूपांतर थेट हिंसाचारात झाले.
नाशिकच्या येवल्यात काय घडलं? :
नाशिक जिल्ह्यातील येवला नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चारचा निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील मोमीनपुरा भागात तुफान हाणामारी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पराभवानंतर वादाला सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. या वादातून शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या घटनेत तीन पुरुष आणि एका महिलेला दुखापत झाली असून सर्व जखमींना येवला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणत पोलिसांनी जमाव पांगवला असून या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Nagar Panchayat Election Result | पैठण आणि धुळ्यातही तणावाचे चित्र :
छत्रपती संभाजीनगर (Chatrpati Sambhajinagar) जिल्ह्यातील पैठणमध्येही निकालानंतर तणाव निर्माण झाला. येथे दोन पराभूत उमेदवारांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आले. वाद वाढत गेल्याने नेहरू चौक परिसरात दगडफेक झाली. या घटनेत पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. निवडणुकीतील अपयशाला एकमेकांना जबाबदार धरल्याने हा संघर्ष उफाळून आला, असे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.
दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातही निकालानंतर तणावाची घटना घडली. विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक केली. वाल्मिक नगर परिसरात हा प्रकार घडल्याने काही काळ भीतीचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. (Nagar Panchayat Election Result)
राज्यातील बहुतेक ठिकाणी निकाल शांततेत स्वीकारले गेले असले तरी या घटनांनी निवडणुकीनंतरचा काळ प्रशासनासाठी संवेदनशील ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून सर्व घटनांचा तपास सुरू असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी संबंधित भागात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.






