Urmila Kendre Wins | राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना अनेक ठिकाणी राजकीय चित्र स्पष्ट होत आहे. काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांना धक्का बसत असतानाच काही ठिकाणी प्रस्थापित नेत्यांनी आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगरपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. (Urmila Kendre Wins)
या निवडणुकीत माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे या निवडणूक रिंगणात होत्या. स्थानिक पातळीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. अखेर निकाल जाहीर होताच उर्मिला केंद्रे यांनी दणदणीत विजय मिळवत आपल्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
उर्मिला केंद्रे यांचा विजय, मुंडे कुटुंबाचा जल्लोष :
मिळालेल्या माहितीनुसार उर्मिला केंद्रे यांनी गंगाखेड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत होत्या. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून विजयोत्सवाला सुरुवात झाली आहे.
बहिणीच्या विजयाची बातमी समजताच धनंजय मुंडे स्वतः गंगाखेडमध्ये दाखल झाले. त्यांनी बहिणीचे अभिनंदन करत कार्यकर्त्यांसोबत आनंद साजरा केला. गुगाल उधळत जल्लोष करण्यात आला असून, या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक पातळीवर मोठे बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. या विजयानंतर गंगाखेडमध्ये मुंडे समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
Urmila Kendre Wins | परभणी जिल्ह्यातील राजकीय गणित बदलतेय? :
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील सातही नगरपालिकांच्या निवडणुका चांगल्याच चुरशीच्या झाल्या होत्या. एकूण सात नगरपालिकांपैकी तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती आहे. यामुळे जिल्ह्यात अजित पवार गटाची पकड मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (Urmila Kendre Wins)
दुसरीकडे, जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना सेलू नगरपालिकेत मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. जिंतूरमध्ये भाजप आघाडीवर असली तरी सेलूमध्ये काँग्रेसने वरचढ ठरण्याची चिन्हे आहेत. सोनपेठ आणि मानवत या नगरपालिकांमध्येही अजित पवार गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी नुकतीच जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून, काँग्रेससाठीही हा सकारात्मक संकेत मानला जात आहे. एकूणच परभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालामुळे आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.






