Sanjay Raut | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेने थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिंदे गटावर टीका करत मतांची मागणी करणाऱ्या मनसेने निकालानंतर घेतलेल्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसेच्या निर्णयावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) या निर्णयाशी सहमत नसून ते या घडामोडींमुळे व्यथित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक पातळीवरील निर्णयावर आक्षेप :
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेने घेतलेला निर्णय हा स्थानिक पातळीवर झाला असून तो राज ठाकरे यांची अधिकृत भूमिका नाही. स्थानिक नेत्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय झाल्याचे त्यांनी नमूद केले. (Kalyan Dombivli Municipal Election)
राज ठाकरे यांनी स्वतः या निर्णयाशी असहमती दर्शविल्याचे सांगत राऊत यांनी स्पष्ट केले की, पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन जर स्थानिक पातळीवर असे निर्णय घेतले जात असतील तर त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.
Sanjay Raut | काँग्रेसचं उदाहरण देत कारवाईची मागणी :
राऊत यांनी (Sanjay Raut) अंबरनाथमधील काँग्रेसच्या उदाहरणाचा उल्लेख करत सांगितले की, भाजपसोबत गेलेल्या 12 नगरसेवकांवर काँग्रेसने तात्काळ कारवाई केली होती. त्याच धर्तीवर मनसेनेही कल्याण-डोंबिवलीतील निर्णय घेणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी अप्रत्यक्ष मागणी त्यांनी केली.
या संपूर्ण घडामोडींमुळे आगामी महापालिका राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता असून, मनसे आणि ठाकरे गटाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






