Maharashtra | इराण (Iran), इस्रायल (Israel) आणि अमेरिका (United States) यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रावर उमटताना दिसत आहेत. इंधनदरवाढीची भीती निर्माण झाली असताना पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या आहेत. त्याचवेळी द्राक्ष, केळी आणि कांदा उत्पादकांना निर्यातीतील अडथळ्यांचा फटका बसत असल्याची चर्चा आहे. मुंबईतील जेएनपीटी (JNPT) बंदरावरील कंटेनरस्थितीबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
द्राक्ष निर्यात आणि बंदरस्थिती :
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आणि द्राक्ष निर्यातदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले (Kailasrao Bhosale) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या युद्धाचा राज्यातील द्राक्ष निर्यातीवर थेट परिणाम झालेला नाही. निर्यात प्रक्रिया नियमित सुरू असून बाजारभावही समाधानकारक आहेत. आखाती देशांकडे मुख्यत्वे डिसेंबर आणि जानेवारीत मोठ्या प्रमाणावर द्राक्षे पाठवली जातात, तर फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान युरोप, यूके आणि रशिया या बाजारपेठांकडे निर्यात होते. सुवेझ कालवा (Suez Canal) मार्ग दोन वर्षांपासून बंद असल्याने पर्यायी मार्गांचा वापर सुरू आहे, त्यामुळे मोठा अडथळा निर्माण झालेला नाही.
मुंबईतील जेएनपीटी बंदरावर सुमारे २०० कोटी रुपयांचे द्राक्ष कंटेनर अडकले असल्याच्या चर्चांवर बोलताना भोसले यांनी स्पष्ट केले की, कांदा, तांदूळ, केळी आणि इतर मालाच्या गर्दीमुळे काही प्रमाणात विलंब झाला होता. मात्र मोठ्या नुकसानीची कोणतीही अधिकृत नोंद नाही. सध्या थॉमसन द्राक्षांना प्रतिकिलो १५० ते १६० रुपये, तर क्रिमसन प्रकाराला १५० ते १७० रुपये दर मिळत आहे. देशांतर्गत बाजारात बिगर निर्यातक्षम द्राक्षे ७० ते ८० रुपयांनी विकली जात आहेत. मागील वर्षी अवकाळी पावसामुळे ७० टक्के बागांचे नुकसान झाले होते आणि केवळ ३० टक्के उत्पादन बाजारात आले होते, त्यामुळे यंदा दर दुपटीने वाढले आहेत.
Maharashtra | सांगली, लातूर आणि जळगावमध्ये वाढती अडचण :
सांगली (Sangli) जिल्ह्यात परिस्थिती गंभीर आहे. सुमारे ३५० कंटेनर द्राक्षे कोल्ड स्टोरेजमध्ये साठवलेली असून ७०० हून अधिक कंटेनरमधील माल बागेतच आहे. मुंबई बंदरात ३०० कंटेनर थांबले असल्याने जवळपास १५ हजार टन द्राक्षांची आखाती देशांकडे जाणारी निर्यात अडली आहे. कोल्ड स्टोरेज हाउसफुल झाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
लातूरमधील (Latur) व्यापाऱ्यांचा शेकडो टन माल इराणच्या बंदरात अडकून पडला आहे. पुढील पाठवणी थांबल्याने आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. व्यापारी श्रीहरी काल्या (Shrihari Kalya) यांचा मालही तिथेच अडकलेला आहे. पुणे मार्केट यार्डमधील व्यापारीही चिंतेत असून आयात-निर्यात साखळी विस्कळीत झाली आहे. इराणमधून येणाऱ्या सफरचंदांच्या किमतीत सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Grape Export Maharashtra)
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांनाही (Banana Crisis) मोठा फटका बसला आहे. १०० हून अधिक केळीचे कंटेनर जेएनपीटी येथे थांबले आहेत. रमजान काळात दररोज १० ते १२ कंटेनर आखाती देशांकडे जात असत; मात्र सध्या निर्यात पूर्णपणे ठप्प आहे. पूर्वी अडीच हजार रुपयांपर्यंत दर मिळणाऱ्या केळीला आता फक्त १,००० ते १,५०० रुपये दर मिळत आहे. नाशवंत माल असल्याने शेतकऱ्यांसमोर तो साठवण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.






