MHADA Pune Lottery | पुणेकरांसाठी घराचे स्वप्न साकार करण्याची मोठी संधी पुन्हा उपलब्ध झाली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 4186 घरांच्या संगणकीय सोडतीसाठी अर्ज करण्याच्या अंतिम तारखेत वाढ करण्यात आली आहे. आधी ठरलेली अंतिम तारीख वाढवून आता 30 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पीएमआरडीए परिसरातील घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना काही दिवसांची अतिरिक्त दिलासा मिळाला आहे. (MHADA Pune Lottery)
म्हाडाच्या या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 1,82,781 ऑनलाइन अर्ज मंडळाकडे आले आहेत. यापैकी 1,33,885 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाल्याची माहिती मंडळाने दिली आहे. वाढलेल्या मुदतीमुळे उर्वरित इच्छुक अर्जदारांना कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी आणि अनामत रक्कम भरण्यासाठी आणखी वेळ मिळणार आहे. संगणकीय सोडत 11 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता घेण्यात येणार आहे.
तांत्रिक अडचणींमुळे वाढवावी लागली तारीख :
अनेक अर्जदारांकडून कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने आणि पुरेशा वेळेअभावी अनेकांनी मुदतवाढ मागितली होती. या पार्श्वभूमीवर मंडळाने नागरिकांचा प्रतिसाद आणि अडचणी लक्षात घेऊन ही शेवटची संधी दिल्याचे स्पष्ट केले आहे. अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा 30 नोव्हेंबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत करता येणार असून, RTGS/NEFT द्वारे भरणा 1 डिसेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येईल. (MHADA Pune Lottery)
म्हाडा अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोडतीसाठीचे नवीन वेळापत्रक तसेच आवश्यक सूचना अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार असून सोडतीसंबंधी इतर सर्व अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. नागरिकांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, माहिती अचूक भरावी आणि अनामत रक्कम वेळेत जमा करावी, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले.
MHADA Pune Lottery | चार घटकांमध्ये विभागलेली सोडत :
पुणे मंडळाने जाहीर केलेली ही सोडत चार मुख्य घटकांमध्ये विभागली आहे. म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेअंतर्गत 1683 सदनिका उपलब्ध असून, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 299 सदनिका राखीव आहेत. तसेच पीएमआरडीए हद्दीतील 15 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 864 सदनिकांचा समावेश आहे. शिवाय पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (Pimpri chinchwad mahapalika)आणि पीएमआरडीए हद्दीतील 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 3222 सदनिका उपलब्ध आहेत.
तसेच पुण्यात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो कुटुंबांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे या सोडतीची उत्सुकता आणखी वाढली असून 11 डिसेंबर रोजी होणाऱ्या लॉटरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






