MHADA Lottery 2025 | म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी नुकतीच पार पडली असून अनेकांना त्यांच्या स्वप्नातील घराची संधी मिळाली आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात 11 ऑक्टोबर रोजी संगणकीय पद्धतीने झालेल्या या सोडतीत 5354 घरं आणि 77 भूखंडांसाठी भाग्यवान विजेते निश्चित झाले आहेत. विजेत्यांची यादी जाहीर झाल्यानंतर आता म्हाडाकडून Winner Intimation Letter म्हणजेच सदनिका विजेता सूचना पत्र देण्यास सुरुवात झाली आहे. (MHADA Lottery 2025)
सध्या या पत्राच्या प्रती डाउनलोड करण्यासाठी विजेत्यांकडून मोठी उत्सुकता दिसून येत आहे. अनेक विजेते आपल्या मोबाईलवर आलेल्या म्हाडाच्या एसएमएस नंतर पुढील प्रक्रिया काय करायची याबाबत माहिती शोधत आहेत. म्हाडाने या प्रक्रियेबाबत स्पष्ट मार्गदर्शन दिलं असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात पूर्ण करता येते. (MHADA Lottery 2025)
विजेत्यांची घोषणा आणि पुढील प्रक्रिया :
कोकण मंडळाच्या या सोडतीत ज्या नागरिकांना लॉटरी लागली आहे, त्यांना म्हाडाकडून अधिकृतपणे सूचना पत्र दिलं जात आहे. हे पत्र मिळाल्यानंतर विजेत्यांना आपल्या म्हाडा अकाऊंटमधून Accept Tenement म्हणजेच “सदनिका स्वीकारणे” किंवा Surrender Tenement म्हणजे “सदनिका नाकारणे” या दोन पर्यायांपैकी एक निवडावा लागतो.
ही प्रक्रिया म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर (https://housing.mhada.gov.in/) किंवा म्हाडा मोबाइल अॅपमधून करता येते. विजेत्यांनी आपल्या नोंदणीकृत ई-मेल आणि मोबाईल क्रमांकाद्वारे लॉगिन करून पुढील टप्प्यांची पूर्तता करावी लागते.
MHADA Lottery 2025 | विजेता सूचना पत्र कसे डाउनलोड करायचे? :
– सर्वप्रथम म्हाडाच्या housing.mhada.gov.in या वेबसाईटला भेट द्या किंवा म्हाडा अॅप ओपन करा.
– आपल्या नोंदणीकृत क्रेडेन्शियलने Login करा.
– नंतर My Application या सेक्शनवर क्लिक करा.
– तिथे तुम्हाला My Intimation Letters हा टॅब दिसेल.
– त्या टॅबवर क्लिक केल्यावर तुमचं विजेता सूचना पत्र उघडेल.
हे पत्र तुम्ही मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवू शकता.
या प्रक्रियेच्या माध्यमातून विजेते सहजपणे आपलं Intimation Letter मिळवू शकतात. म्हाडाकडून ही सोय संपूर्णपणे पारदर्शक आणि ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे, जेणेकरून नागरिकांना कोणत्याही त्रासाशिवाय घर मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल.






