Menstrual Cycle | महिलांच्या आरोग्यामध्ये मासिक पाळी चक्राला विशेष महत्त्व आहे. जीवनशैली, आहार, झोप अशा अनेक घटकांचा यावर परिणाम होतो आणि पाळी वेळेवर येणे महत्त्वाचे असते. मात्र, काहीवेळा योनीतून होणाऱ्या स्त्रावाचा रंग बदलतो. विशेषतः हिरव्या रंगाचा स्त्राव दिसल्यास, त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
जीवाणू संसर्ग असू शकतो कारण –
योनीमार्गातून हिरव्या रंगाचा स्त्राव (Menstrual Cycle) येण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे जीवाणूजन्य योनीदाह (Bacterial Vaginosis). या स्थितीत योनीमधील चांगल्या आणि वाईट जीवाणूंचे संतुलन बिघडते. या असंतुलनामुळे हिरवा किंवा पिवळसर रंगाचा, दुर्गंधीयुक्त स्त्राव येऊ शकतो आणि खाज सुटते. अस्वच्छता किंवा साबण, इंटिमेट वॉशचा अतिवापर यामुळे ही समस्या वाढू शकते.
जर हिरवा स्त्राव फेसयुक्त, दाट आणि तीव्र दुर्गंधी असलेला असेल, तर ते ट्रायकोमोनियासिस नावाच्या लैंगिक संक्रमित संसर्गाचे (Menstrual Cycle) लक्षण असू शकते. हा संसर्ग एका परजीवीमुळे होतो. यामुळे योनीमध्ये जळजळ, तीव्र खाज, लघवी करताना वेदना आणि लैंगिक संबंधावेळी अस्वस्थता जाणवू शकते. हा संसर्ग लैंगिक जोडीदाराकडूनही पसरू शकतो, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
इतर संभाव्य कारणे आणि प्रतिबंध –
यीस्ट संसर्गामध्ये (Yeast Infection) सामान्यतः पांढरा, दहीसारखा स्त्राव होतो, परंतु गंभीर प्रकरणांमध्ये हा स्त्राव पिवळा किंवा हिरवा असू शकतो. हा संसर्ग कॅन्डिडा (Candida) नावाच्या बुरशीमुळे होतो आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यास वाढतो. यात योनीमार्गात खाज, सूज आणि जळजळ जाणवते. अस्वच्छ सॅनिटरी पॅड वापरणे, जास्त वेळ ओलसरपणा राहणे, घट्ट किंवा कृत्रिम धाग्यांचे अंतर्वस्त्र घालणे यामुळे देखील संसर्ग होऊन स्त्रावाचा रंग बदलू शकतो.
काहीवेळा, गर्भाशय मुखाचा दाह (Menstrual Cycle) किंवा संसर्गामुळेही हिरवा स्त्राव येऊ शकतो. यामुळे वेदना, जळजळ आणि कधीकधी रक्तस्त्रावही होऊ शकतो. हिरवा स्त्राव टाळण्यासाठी योनीमार्गाची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. सुगंधित स्प्रे किंवा इंटिमेट वॉशचा वापर टाळावा. आहारात दही, हिरव्या भाज्यांचा समावेश करावा, भरपूर पाणी प्यावे आणि सुती अंतर्वस्त्रे वापरावीत. वारंवार संसर्ग होत असल्यास तातडीने स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.






