Ashadhi Wari | पुणे (Pune) आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच इंद्रायणी (Indrayani River) नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळ्यात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सुरक्षिततेला प्राधान्य देत संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) पालखी सोहळ्याचा पारंपरिक मार्ग बदलण्याचा निर्णय प्रशासन आणि सोहळा प्रमुखांनी घेतला असून भाविकांना नव्या मार्गाने वारीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुरामुळे पारंपरिक मार्गात बदल :
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे. नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्याने या पुलांवरून पालखी नेणे धोकादायक ठरू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) पूर्ण होईपर्यंत पारंपरिक मार्गाचा वापर टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशासनाने पर्यायी मार्गाची आखणी केली असून पारंपरिक मार्गावरील पुलांचा तांत्रिक अहवाल अनुकूल न आल्यास पालखी मरकळ रोड (Markal Road) मार्गे चऱ्होली फाटा (Charholi Phata) येथे नेण्यात येईल. त्यानंतर दिघी (Dighi), विश्रांतवाडी (Vishrantwadi) मार्गे पुण्याकडे पालखीचा पुढील प्रवास होणार आहे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Ashadhi Wari | वारकरी आणि दिंडींसाठी महत्त्वाच्या सूचना :
पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप (Rajendra Umap) यांनी सर्व दिंडी प्रमुख आणि वारकऱ्यांना बदललेल्या मार्गाची माहिती देत आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पुलांची तपासणी पूर्ण होईपर्यंत पारंपरिक मार्गाने पालखी नेणे शक्य नसल्यामुळे सर्व भाविकांनी यंदा चऱ्होली फाट्यावरून वारीत सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले. ऐनवेळी होणारी गैरसोय आणि गर्दी टाळण्यासाठी नव्या नियोजनाची माहिती प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे.
दरम्यान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि मंदिर परिसरातील गर्दी लक्षात घेऊन प्रवेश व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला मानाच्या रथासमोरील 1 ते 27 दिंडी, रथामागील 1 ते 20 दिंडी तसेच पोटधारक मिळून 56 दिंड्यांतील केवळ 10 प्रतिनिधींना प्रवेश देण्याचा निर्णय झाला होता. मात्र नंतर या नियोजनात सुधारणा करून प्रस्थान सोहळ्यावेळी मानाच्या दिंड्यांमधील 50 जणांना प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.






