Bank Holiday | मार्च महिन्यात सण-उत्सवांची रेलचेल असताना बँकांच्या कामकाजावरही त्याचा परिणाम दिसून येणार आहे. विविध धार्मिक सणांमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये बँका काही दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुमचे बँकेत महत्त्वाचे व्यवहार प्रलंबित असतील तर ते वेळेत पूर्ण करून घेणे गरजेचे ठरणार आहे. (March Bank Holidays List)
सणांमुळे बँकांना सुट्ट्या :
आर्थिक वर्ष संपण्याच्या काळात अनेक नागरिक बँकांशी संबंधित व्यवहार पूर्ण करण्यासाठी धावपळ करत असतात. मात्र मार्चच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात काही महत्त्वाच्या सणांमुळे बँकांना सलग सुट्ट्या असणार आहेत. गुढीपाडवा, ईद आणि रामनवमीसारख्या सणांच्या निमित्ताने अनेक राज्यांमध्ये बँकांचे व्यवहार ठप्प राहतील. त्यामुळे नागरिकांनी आपली आर्थिक कामे आधीच पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे.
बँकांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक देशभर एकसारखे नसते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) स्थानिक सण आणि परंपरांनुसार राज्यनिहाय सुट्ट्या जाहीर करते. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये एकाच दिवशी बँका बंद राहतील असे नाही. मात्र या काळात ऑनलाइन बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम सेवा सुरू राहणार असल्याने डिजिटल व्यवहारांमध्ये अडचण येणार नाही.
Bank Holiday | राज्यानुसार सुट्ट्यांचे वेळापत्रक :
19 मार्च रोजी गुढीपाडवा सणानिमित्त महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे बँका बंद राहतील. त्याच दिवशी तेलुगू नववर्ष उगादीमुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि राजस्थानमध्येही बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे या राज्यांतील ग्राहकांनी 18 मार्चपूर्वीच आवश्यक बँक व्यवहार पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे.
यानंतर 20 मार्च रोजी रमजान ईद म्हणजेच ईद-उल-फित्र सणामुळे जम्मू-काश्मीर, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये बँका बंद राहतील. पुढील दिवशी म्हणजे 21 मार्चला महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये ईदच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी असणार आहे. (March Bank Holidays List)
याशिवाय 22 मार्चला रविवार आणि 28 मार्चला चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. पुढे 26 मार्चला रामनवमीमुळे महाराष्ट्र, मुंबई, नागपूर, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये बँकांचे कामकाज होणार नाही. काही भागात 27 मार्चला चैत्र दशमीचीही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महिन्याच्या शेवटी 31 मार्चला महावीर जयंतीमुळे महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये बँका बंद असतील. विशेष म्हणजे हा दिवस आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असला तरी सार्वजनिक सुट्टीमुळे सामान्य ग्राहकांसाठी बँक सेवा उपलब्ध राहणार नाहीत.






