Tax Deadline | आर्थिक वर्ष 2025-26 संपण्याच्या टप्प्यावर आले असताना करदात्यांसाठी एक महत्त्वाची तारीख जवळ येत आहे. आगाऊ कर अर्थात ॲडव्हान्स टॅक्सचा शेवटचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 15 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची करदेयता ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांनी ही रक्कम वेळेत भरली नाही, तर त्यांना अतिरिक्त व्याज आणि दंडाचा सामना करावा लागू शकतो.
आगाऊ कराची संकल्पना आणि लागू असलेले नियम :
प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘कमाईप्रमाणे कर’ या तत्त्वावर आधारित आगाऊ कर प्रणाली राबवतो. या व्यवस्थेनुसार संपूर्ण कररक्कम वर्षाच्या शेवटी भरण्याऐवजी ती वर्षभरात टप्प्याटप्प्याने जमा करण्याची अपेक्षा असते. यामुळे करदात्यांवर अचानक मोठा आर्थिक भार पडत नाही आणि सरकारलाही महसूल नियमितपणे मिळत राहतो. (Income Tax rules India)
नियमांनुसार ज्या व्यक्तींची एकूण कर देयता 10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना आगाऊ कर भरणे बंधनकारक आहे. केवळ व्यापारी किंवा व्यावसायिकांनाच हा नियम लागू होत नाही, तर काही वेळा पगारदार कर्मचाऱ्यांनाही आगाऊ कर भरावा लागू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला पगाराशिवाय बँकेवरील व्याज, घरभाडे, शेअर बाजारातील नफा किंवा इतर गुंतवणुकीतून उत्पन्न मिळत असेल आणि त्यावर पुरेसा टीडीएस (TDS) वजा झाला नसेल, तर त्या उत्पन्नावर आगाऊ कर भरावा लागतो.
Tax Deadline | हप्ते आणि दंडाची तरतूद :
आगाऊ कर भरण्यासाठी वर्षभरात चार टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. पहिला हप्ता 15 जूनपर्यंत एकूण कराच्या किमान 15 टक्के, दुसरा हप्ता 15 सप्टेंबरपर्यंत 45 टक्के, तिसरा हप्ता 15 डिसेंबरपर्यंत 75 टक्के आणि चौथा म्हणजे अंतिम हप्ता 15 मार्चपर्यंत 100 टक्के कररक्कम भरणे अपेक्षित असते. सध्या या चौथ्या आणि शेवटच्या हप्त्याची मुदत जवळ आल्यामुळे करदात्यांनी वेळेत रक्कम जमा करणे आवश्यक आहे. (Advance Tax deadline)
जर करदात्यांनी अंतिम मुदतीपूर्वी आगाऊ कर भरला नाही, तर प्राप्तिकर कायद्यातील कलम 234B आणि 234C अंतर्गत दंडात्मक व्याज आकारले जाते. थकबाकी रकमेवर दरमहा 1 टक्का दराने व्याज आकारले जाऊ शकते. त्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी वेळेत कर भरणे महत्त्वाचे ठरते. करदाते आता प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन ‘e-Pay Tax’ पर्याय निवडून ‘Challan 100 (Advance Tax)’च्या माध्यमातून नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे ऑनलाईन पेमेंट करू शकतात.






