Manoj Jarange Patil | राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण तापले आहे. १५ जानेवारी रोजी मतदान, तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार असून, या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जाहीरपणे भूमिका मांडल्याने निवडणूक रणधुमाळीत मोठी खळबळ उडाली आहे. बुलढाण्यातील भाषणात त्यांनी मराठा समाजास उद्देशून थेट आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. (Maharashtra Politics)
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जरांगे पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत, समाजाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना मतदान करू नये, असे स्पष्ट आवाहन केले आहे.
‘समाजाच्या विरोधात गेलेल्यांना मतदान नको’ :
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जे नेते आणि पक्ष मराठा आरक्षणाच्या विरोधात गेले, तेच आज निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे आहेत. अशा लोकांना मतदान करू नका, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. मराठा समाजाने आता कट्टर आणि ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर समाजघटकांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप केला. (Municipal Election Maharashtra)
लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, त्या वेळी जनतेने ताकद दाखवली होती. निवडणुकीदरम्यान पैसे वाटप होत असल्याचे आरोप करत, काही नेते खुलेआम नोटांची बंडले घेऊन फिरत असल्याचा दावाही त्यांनी केला. यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.
Manoj Jarange Patil | सर्व पक्ष एकत्र, जनता मात्र एकटी? :
पुढे बोलताना जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यावर टीका केली. हे सर्व पक्ष आपापसात कुठे ना कुठे जुळवून घेत आहेत, मग त्यांचे खरे शत्रू कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गोरगरीब जनता एकटी पडली असून, जनतेला पर्यायच दिला जात नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. (Boycott Voting Call)
लोकांना जर खरा पर्याय मिळाला, तर जनता सत्ताधाऱ्यांना उलटपालट केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी आपण थेट निवडणुकीत उतरत नसल्याचे सांगितले, मात्र मोठ्या सत्ताकेंद्रांवर माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला. त्यांच्या या थेट भूमिकेमुळे महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.






