Manoj Jarange Patil | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून, मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील आणि विरेंद्र पवार यांना आझाद नगर पोलिसांकडून ही नोटीस पाठवण्यात आली असून, त्यांना 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मार्च महिन्यात मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात जरांगे पाटील, विरेंद्र पवार (Virendra Pawar) आणि इतर काही सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून, त्याच अनुषंगाने पोलिसांनी ही नोटीस जारी केली आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी आवश्यक माहिती मिळवण्यासाठी आणि वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? :
२१ एप्रिल रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३७(३), ३८, १३५ आणि १३६ नुसार दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना काही महत्वाचे पुरावे मिळाले आहेत. या गुन्ह्याशी संबंधित तथ्य जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि इतरांना चौकशीसाठी बोलावले आहे. नोटिशीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की त्यांनी 10 नोव्हेंबर रोजी हजर राहून तपासात सहकार्य करावे.
या प्रकरणात मनोज जरांगे पाटील, पांडुरंग तारक, गंगाधर काळकुटे नाना, चंद्रकांत भोसले, वीरेंद्र पवार, आणि प्रशांत सावंत यांची नावे समोर आली आहेत. या सर्वांवर गुन्हा दाखल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (Manoj Jarange Patil)
Manoj Jarange Patil | आंदोलन आणि पार्श्वभूमी :
मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनादरम्यान अनेकांनी 27 ऑगस्टपासून आझाद मैदानावर साखळी उपोषण केले होते. या उपोषणात आरक्षणासोबतच आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची मागे घेण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर 2 सप्टेंबर रोजी सरकारच्या शिष्टमंडळाकडून गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले गेले होते.
मात्र, यानंतरही गुन्ह्यांचा तपास सुरूच राहिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. 10 नोव्हेंबर रोजी ते पुन्हा मुंबईत दाखल होणार असून, त्यांच्या उपस्थितीने राज्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडण्याची शक्यता आहे.






