Manoj Jarange | संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण गेल्या अनेक दिवसांपासून तापले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तिय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. त्यांनी अखेर राजीनामा दिला आहे. (Manoj Jarange)
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला. यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी मागणी केली आहे. जरांगे पाटील यांनी मुंडे यांना देखील सहआरोपी करावे, अशी मागणी करत संताप व्यक्त केलाय.
काय म्हणाले मनोज जरांगे?
मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर टीका करत म्हटले की, “चार्जशीट दाखल झाल्यावर राजीनामा देण्याची नौटंकी केली जातेय. जर त्यांच्यात नैतिकता असती, तर त्यांनी आधीच पद सोडले असते. पण हा प्रकार म्हणजे ‘तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो’ यासारखा आहे.”
धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा- जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. “धनंजय मुंडे 302 मध्ये आहे म्हणजे आहे. मी फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे मागणी करतो की पुरवणी तपास करा. पुरवणी तपासात सर्वांना सहआरोपी करा. धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा. दोन ते तीन महिन्यात प्रकरण संपवा. या सर्वांना फाशी द्या”, असं जरांगे (Manoj Jarange) म्हणाले.
“यांची लंका पाण्यात बुडणार आहे. मग्रुरीमुळे यांचा कार्यक्रमच होणार आहे. आजही राजीनामा देताना मग्रुरी दाखवली. आजाराचं कारण दाखवलं. त्यांनाही खूनाचा पश्चात्ताप नाही. जे आरोपी हसत होते खून करताना तसंच हे हसत आहेत”, असा संताप देखील जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
Title : Manoj Jarange on Dhananjay Munde Resignation






