Manikrao Kokate | राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना, आपला स्वभाव कठोर असला तरी उद्देश स्वच्छ असल्याचं ठामपणे सांगितलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलेल्या तंबीवरही अप्रत्यक्ष भाष्य केलं.
“मी जसा आहे, तसाच राहीन”
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या शैलीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “माझा स्वभाव जन्मजात आहे, तो एका दिवसात बदलणे शक्य नाही. मात्र, माझ्या बोलण्यामागे कोणताही दुहेरी हेतू नाही. मी जे काही बोलतो, ते परखडपणे सत्य बोलतो,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
तसेच, “शेतकऱ्यांचे हितच माझं प्रमुख उद्दिष्ट आहे. शेतीमध्ये नवे प्रयोग करावेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा आणि नव्या पिढीने शेतीकडे वळावं यासाठी मी काम करत आहे,” असं स्पष्टीकरण देत त्यांनी त्यांच्या वक्तव्यामागील विचार मांडला. यापूर्वी केलेल्या विधानामुळे निर्माण झालेल्या गैरसमजांबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती.
अजित पवारांचा इशारा, तरीही कोकाटे ठाम
मागील काही दिवसांत माणिकराव कोकाटे यांच्यावर त्यांच्या शेतकरीविषयक विधानांमुळे प्रचंड टीका झाली होती. त्यांनी म्हटलं होतं की, शेतकरी कर्जमाफीचा पैसा लग्नकार्यासाठी वापरतात. या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या एका बैठकीत कोकाटेंना स्पष्ट शब्दांत तंबी दिल्याची माहिती पुढे आली.
त्यांनी स्पष्ट केलं की, “जर अशी वक्तव्य पुन्हा झाली, तर मंत्रीपद धोक्यात येईल,” असा थेट इशारा अजित पवारांनी दिला होता. दरम्यान, कोकाटेंनी कांद्याच्या बाजारभावावर पुन्हा एक नवीन विधान करून वादाला तोंड फोडलं आहे. “एका शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला म्हणून सगळ्यांनी कांदा पिकवायला सुरुवात केली, तर भाव पडणारच,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
Title: Manikrao Kokate Justifies His Bold Nature






