Makar Sankranti 2026 | हिंदू पंचांगानुसार 2026 या नववर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांती. येत्या 14 जानेवारी 2026 रोजी हा सण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात आणि याच दिवशी उत्तरायणास सुरुवात होते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या या संक्रमणामुळे वातावरणातील तसेच मानवी जीवनातील ऊर्जा बदलते. त्यामुळे या दिवशी केलेली कृती थेट शुभ किंवा अशुभ परिणाम देऊ शकते, असे मानले जाते. (Makar Sankranti 2026)
मकर संक्रांतीचा दिवस पुण्यकाळ मानला जात असल्यामुळे या दिवशी काही गोष्टी मुद्दाम टाळल्यास आयुष्यात सकारात्मक बदल घडतात, असे ज्योतिषाचार्य सांगतात. अन्यथा धनहानी, मानसिक अस्थिरता आणि घरात नकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी आवर्जून टाळाव्यात, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
मकर संक्रांतीच्या दिवशी ‘या’ गोष्टी टाळा :
मकर संक्रांतीच्या दिवशी राग, वाद-विवाद, भांडण किंवा कटू शब्द वापरणे टाळावे. हा दिवस गोडवा वाढवण्याचा मानला जातो. ‘तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ या म्हणीमागेही याच भावनेचा अर्थ दडलेला आहे. सूर्यदेव शांती, संयम आणि तेजाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे राग आणि आक्रमक वर्तन केल्यास सूर्यदोष वाढतो, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. (Sankranti Do’s and Don’ts)
या दिवशी खोटं बोलणं, फसवणूक करणं किंवा चुकीचे व्यवहार टाळावेत. मकर संक्रांती हा सत्य, कर्मशुद्धी आणि आत्मपरीक्षणाचा दिवस मानला जातो. त्यामुळे असत्य व कपट केल्यास त्याचे नकारात्मक परिणाम दीर्घकाळ भोगावे लागू शकतात. तसेच या दिवशी केस कापणे किंवा नखं कापणे टाळावे, अशी पारंपरिक मान्यता आहे. संक्रमणकाळात शरीरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि पुण्यकाळाचा अपव्यय होतो, असे सांगितले जाते.
Makar Sankranti 2026 | सकारात्मक विचार आणि शांत मन ठेवणे लाभदायक :
नकारात्मक विचार, ईर्ष्या, द्वेष किंवा शिवीगाळ यापासून दूर राहणेही तितकेच आवश्यक आहे. सूर्य संक्रमणाच्या काळात मनातील विचारांचा थेट परिणाम कर्मावर होतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे सकारात्मक विचार आणि शांत मन ठेवणे लाभदायक ठरते. याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार, मद्यपान किंवा तंबाखू सेवन टाळावे. हा दिवस सात्त्विक मानला जात असल्यामुळे तामसिक गोष्टी केल्यास मानसिक अस्वस्थता वाढू शकते. (Makar Sankranti 2026)
गरिबांचा, वृद्धांचा किंवा आई-वडिलांचा अपमान करणे या दिवशी विशेषतः टाळावे. सूर्य हा पितृकारक ग्रह मानला जातो आणि मोठ्यांचा अपमान केल्यास पितृदोष वाढतो, अशी धार्मिक धारणा आहे. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी दान टाळू नये. विशेषतः तीळ, गूळ, वस्त्र किंवा अन्नदान केल्यास पुण्य प्राप्त होते. दान न केल्यास मिळणारी पुण्यसंधी हातातून निसटते, असे मानले जाते.






