Weather Update | राज्यात काही दिवसांपासून हिवाळ्याची चाहूल लागली असली तरी अचानक तापमानात वाढ होत असल्याने थंडीचे अस्तित्व जवळपास लुप्त झाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या आठवड्यात कडाक्याची थंडी जाणवल्यानंतर आता हवामानात स्पष्ट बदल अनुभवायला मिळत आहेत. ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता आणि तापमानातील चढउतार यामुळे नागरिकांना हिवाळ्याची प्रतीक्षा अधिक वाढली आहे. दरम्यान, हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी आज यलो अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहू शकतो, त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा सूचनाही विभागाने दिला आहे.
समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम :
दक्षिण आणि पश्चिम किनारपट्टीवर सध्या दोन महत्त्वाची हवामान प्रणाली सक्रिय झाल्यामुळे पावसाचे सावट गडद होत आहे. मलेशिया किनाऱ्याजवळ निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत झाले असून त्याचा परिणाम मलक्का जलसंधी आणि दक्षिणेकडील समुद्री भागांवर दिसत आहे. याशिवाय बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात आणि श्रीलंकेच्या दक्षिणेस आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. या दोन प्रणालींच्या संयुक्त परिणामामुळे देशातील किनारी भागांत पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
या हवामान बदलाचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही जाणवत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने राज्यात उष्णतेची लाट अनुभवायला मिळत आहे. काही ठिकाणी आकाश पूर्णपणे ढगाळ असून हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे थंडीला योग्य सुरुवात होण्यास उशीर होत असल्याचे हवामान विभागाचे निरीक्षण आहे.
Weather Update | धुळे 14 अंशांवर; मुंबई-पुण्यात उकाड्याचा चटका कायम :
धुळे (Dhule) आणि निफाड परिसरात किमान तापमान 14 अंशांपर्यंत खाली आले असले तरी थंडीची लक्षणीय कमी जाणवत आहे. दरम्यान, मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकण पट्टीत दुपारचा उकाडा चांगलाच जाणवत आहे. उकाड्याची तीव्रता संध्याकाळपर्यंत टिकत असून नागरिकांना दमट हवामानाचा त्रास वाढला आहे. पुढील 48 तास राज्यात तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नसल्याचे IMDने स्पष्ट केले आहे.
कोकण (Kokan), मध्य महाराष्ट्र, मराठवाडा (Marathwada) आणि अंतर्गत भागांमध्ये आज आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. काही ठिकाणी हलका पाऊस किंवा ढगाळ वातावरणामुळे उष्णतेत अनियमितता राहील. मुंबई, रायगड, पालघर (Palghar) आणि ठाणे जिल्ह्यात दुपारी उकाडा अधिक जाणवणार असल्याने नागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
उत्तर भारतातही कमी झाली थंडी; हिमालयीन वाऱ्यांचा वेग मंदावला :
फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर भारतातही गारठ्यात घट झाल्याचे दिसते. हिमालयामधून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग कमी झाल्यामुळे पर्वतीय आणि मैदानी भागात तापमान वाढत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर यांसह पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील तापमानात वाढ होत आहे. काही भागांत सकाळी धुक्याचे प्रमाण कायम असले तरी थंडीची कडाकी आता जाणवत नसल्याचे चित्र दिसते.
या सर्व हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस थंडी परत येण्याची शक्यता अत्यंत कमी असून राज्यात दमट उष्णतेचा परिणाम कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.






