Weather Update | राज्यातील पावसाच्या तीव्रतेत काही प्रमाणात घट झाली असली तरी, हवामान विभागाने पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील २४ तास सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत हलक्याफुलक्या सरी पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये आकाश ढगांनी आच्छादलेलं असून, अधूनमधून हलकासा पाऊस पडत आहे. यामुळे गारवा मात्र कायम आहे.
पुणे, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा खंड :
पुणे शहरात आज ढगाळ वातावरण राहणार असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत पावसामध्ये विश्रांती जाणवत आहे. या भागांमध्ये जोरदार पावसाचा अनुभव मागील आठवड्यात आला होता, पण आता काहीसा खंड पडलेला आहे. (Maharashtra Weather Update)
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगरमध्येही आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही भागांत हलक्या सरींचा अंदाज आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर पावसाचा इशारा सध्या या भागासाठी नाही.
Weather Update | पूर्व विदर्भात यलो अलर्ट, जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन :
हवामान विभागाच्या माहितीनुसार, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आजही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. (Rain Yellow Alert)
दरम्यान, पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. मराठवाड्यातही सध्या जोरदार पावसाची विश्रांती आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आदी जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा जोर नाही. (Maharashtra Weather Update)






