Weather Update | राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत असतानाच आता हवामानात बदल दिसून येत आहे. आज (१० सप्टेंबर) राज्यातील बहुतांश भागांत पावसाची उघडीप राहणार आहे. मात्र उद्यापासून (११ सप्टेंबर) विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने ३ दिवसांचा यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात पावसाचा जोर ओसरला :
मध्य भारतात सक्रिय असलेली कमी दाबाची प्रणाली पाकिस्तानच्या दिशेने सरकल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. परिणामी राज्यातील अनेक भागांत स्वच्छ सूर्यप्रकाश दिसून येत आहे. या बदलामुळे कमाल तापमानातही वाढ झाली आहे. (Rain Alert)
आज मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड येथे तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, तर इतरत्र आभाळ मोकळं राहण्याची शक्यता आहे.
Weather Update | ऊन-सावलीचा खेळ सुरू :
सध्या आग्नेय पाकिस्तान व त्याच्या आसपासच्या भागांवर एक वादळी प्रणाली सक्रिय आहे. ती गुजरातमधील भूजपासून सुमारे २७० किलोमीटर उत्तरेकडे होती. ही प्रणाली दक्षिण पाकिस्तानकडे सरकत असून पुढील काळात तिची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे.
मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा जोधपूरपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे. बंगालच्या उपसागरातील ओडिशा आणि आंध्र प्रदेश किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर वाऱ्यांची चक्राकार स्थिती नोंदली गेली आहे. (Maharashtra Weather Update)
राज्यात पावसाची तीव्रता कमी झाल्याने ऊन-सावलीचा खेळ सुरू झाला आहे. चंद्रपूरमध्ये राज्यातील सर्वाधिक ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. घाटमाथ्यावर व मध्य महाराष्ट्रातील काही भागांत सकाळच्या वेळी दाट धुक्याचे आवरण दिसून आले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर तुलनेने कमी राहणार असून नागरिकांना दिलासा मिळू शकेल.






