Maharashtra Weather | देशभरात सध्या हवामानामध्ये सतत बदल होत असून, तापमानाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. एकीकडे सूर्य आग ओकत आहे, तर दुसरीकडे काही भागांमध्ये अचानक पावसाने हजेरी लावली आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे नागरिक संभ्रमात आहेत. यामुळे आरोग्याच्या देखील अनेक समस्या वाढल्या आहेत. (Maharashtra Weather )
उत्तर भारतात अचानक पाऊस, पण उष्णतेचा धोका कायम
गेल्या 24 तासांत राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये अचानक पावसाची नोंद झाली, त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली. मात्र, हा दिलासा तात्पुरता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. ओडिशा, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये 14 ते 18 मार्च दरम्यान तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात विदर्भात सर्वाधिक उष्णता
महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढत असून, विशेषतः विदर्भामध्ये ती अधिक जाणवत आहे. ब्रह्मपुरीमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे, तर चंद्रपूर, अकोला, नागपूर आणि वर्धामध्ये तापमान आणखी 1 ते 2 अंशांनी वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये उष्णतेची लाट जाणवत असून, नागरिकांना भर उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात पहाटेच्या वेळेस काहीसा गारवा जाणवत असला, तरी दिवसा तापमान प्रचंड वाढत आहे. (Maharashtra Weather )
दक्षिण भारत आणि पर्वतीय भागांमध्ये वेगळे हवामान
देशाच्या दक्षिण किनारपट्टीवर उष्णतेची लाट कायम असून, तामिळनाडूच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Title : Maharashtra Weather Intense Heat and Sudden Rain Across India






