Maharashtra weather | सध्या महाराष्ट्रासह देशभरात हवामानात सतत बदल होत असून, उष्णतेच्या झळा आणि अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. एका बाजूला उकाड्याने हैराण करणारी स्थिती, तर दुसऱ्या बाजूला अचानक येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे वातावरण पूर्णतः अस्थिर झालं आहे. (Maharashtra weather)
महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीचा इशारा, काही जिल्ह्यांत उष्णता वाढीचा अंदाज
भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान झपाट्याने वाढत आहे. काही भागांत चाळीशी पार गेलेलं तापमान नागरिकांना त्रस्त करत आहे. त्याचवेळी दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात ढगाळ वातावरण तयार होत असून, काही भागांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळपासूनच हवामान विभागाने राज्यासाठी अवकाळी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. हा पाऊस पुढील दोन ते तीन दिवस टिकू शकतो, असंही सांगण्यात आलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे या भागांत ढगाळ हवामान राहील. काही ठिकाणी हलक्याशा सरींचा अनुभव येऊ शकतो. कोकणाला विशेषतः याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्णतेच्या आणि बाष्पीभवन प्रक्रियेमुळे राज्यात अवकाळी ढगही तयार होत आहेत.
देशातही हवामान अस्थिर, उत्तरेत बर्फवृष्टी तर दक्षिणेकडे वादळी पाऊस
देशाच्या एकूण हवामानाचं चित्रही सध्या विचित्र बनलं आहे. नव्यानं सक्रिय झालेला पश्चिमी झंझावात (Western Disturbance) उत्तर भारतात हिमवृष्टीचं वातावरण निर्माण करत आहे. कश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत असून, त्यामुळे तापमानात मोठी घसरण झाली आहे. दुसरीकडे ओडिशा आणि आसपासच्या भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सकाळपासूनच सावध राहण्याचं आवाहन केलं जात आहे. (Maharashtra weather)
त्याचबरोबर कर्नाटक, उत्तर केरळ आणि मध्य महाराष्ट्र या भागांत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यात उष्णतेबरोबरच वादळी पावसाचीही शक्यता निर्माण झाली आहे. हवामानातील या सततच्या उलथापालथीमुळे शेतकऱ्यांचेही मोठं नुकसान होत असून, शेतीसाठी हवामान अनुकूल राहत नाहीये.
Title : Maharashtra weather Heatwave and Unseasonal Rains






