Maharashtra Weather Update | महाराष्ट्रातील हवामानात अचानक बदल दिसून येत असून राज्यातील विविध भागांमध्ये वेगवेगळे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये उकाड्याची तीव्रता वाढल्यामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत, तर विदर्भासह काही भागात ढगांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील 24 तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम भारतातील हवामानावर होत आहे. त्यामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली असून राज्यातील अनेक भागात पावसाच्या सरी आणि वादळी वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. ही परिस्थिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभाव :
उत्तर दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे वातावरणात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. याचबरोबर पश्चिम बंगालच्या उपसागराच्या दिशेने काही सर्क्युलेशन तयार झाल्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे काही भागात गारपीट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 29 मार्चपासून कोकण पट्टा वगळता राज्यातील अनेक भागात पावसाची तीव्रता वाढू शकते. 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल या तीन दिवसांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update | पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पाऊस :
विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून इतर भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे मका पिकाचे नुकसान झाले असून जालना जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
बारामती आणि आसपासच्या भागात अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली. या बदलत्या हवामानामुळे शेतकरी आणि नागरिक दोघांनाही मोठा फटका बसत आहे.
नागरिकांनी घ्यावी खबरदारी :
हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 50 किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
अचानक होणाऱ्या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. तसेच शेतकऱ्यांनी पिकांचे आणि जनावरांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






