Satara IT Park | महाराष्ट्रातील IT क्षेत्राचा वेगाने होत असलेला विस्तार आता पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका महत्त्वाच्या जिल्ह्याकडे वळणार आहे. पुणे आणि सोलापूरनंतर सातारा जिल्ह्यातही मोठ्या IT पार्कला हिरवा कंदील मिळाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे साताऱ्याच्या औद्योगिक वाढीला नवे बळ मिळणार असून तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. (Satara IT Park)
सध्या सातारा जिल्ह्यातील नागेवाडी परिसरात पुणे–बंगळुरू महामार्गालगत असलेल्या 42 हेक्टर 87 आर सरकारी जागेवर हे आधुनिक IT पार्क उभारण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या उद्योग विभागाने याबाबतची अधिसूचना जारी करताच प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंजवडी आणि पुरंदरच्या धर्तीवर तयार होणारे हे पार्क महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचे मोठे IT पार्क ठरणार आहे. (Maharashtra Fourth IT Park)
साताऱ्याला IT पार्कची मोठी भेट :
सातारा जिल्ह्यात IT पार्कच्या उभारणीची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पुढाकाराने एमआयडीसीने जागेची पाहणी, तांत्रिक अहवाल आणि संपूर्ण प्रस्ताव तयार करून तो राज्य शासनाकडे पाठवला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उद्योगमंत्र्यांनी या प्रकल्पाला मंजुरी देत साताऱ्यातील IT पार्कचा प्रश्न निकाली काढला आहे.
या निर्णयामुळे साताऱ्याच्या औद्योगिक क्षेत्रात मोठी क्रांती घडण्याची शक्यता आहे. पुणे-सातारा (Pune – Satara) महामार्गावरील महत्त्वाचा भौगोलिक फायदा, सातारा शहराचे वाढते शिक्षणक्षेत्र, आणि उद्योजकांसाठी अनुकूल वातावरण या सर्व बाबी लक्षात घेता सातारा IT क्षेत्रासाठी नवे केंद्र बनेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Satara IT Park | रोजगार, गुंतवणूक आणि विकासाचा नवा अध्याय :
IT पार्क उभारल्यानंतर साताऱ्यात हजारो नवतरुण-तरुणींना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. आधुनिक कार्यालयीन जागा, डेटा सेंटर्स, स्टार्टअप हब, तंत्रज्ञान आधारित उद्योग आणि बहुरराष्ट्रीय कंपन्यांचे इनक्युबेशन सेंटर तयार करण्याची योजना आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात मोठी गुंतवणूक आकर्षित होणार असून औद्योगिक वाढीचा नवा अध्याय सुरू होणार आहे. (Satara IT Park)
अधिसूचनेनंतर आता जमीन हस्तांतरण, पायाभूत सुविधा उभारणी, रस्ते–पाणी–विद्युतसुविधा, तसेच गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मोहिमा राबवण्यात येणार आहेत. शासनाने पुढील सर्व टप्पे वेगाने राबवण्याचे निर्देश दिले असल्याने IT पार्कचे काम जलदगतीने सुरू होणार आहे.






