PUC Rate Hike | महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) काढण्यासाठी लागणारे दर लवकरच 16 ते 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. परिवहन विभागाने नेमलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला असून सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर हे नवे दर लागू होणार आहेत.
दरवाढीची पार्श्वभूमी :
राज्यात शेवटची पीयूसी दरवाढ 2022 मध्ये झाली होती. आता चार वर्षांनी पुन्हा दरवाढ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि गोवा या राज्यांमधील पीयूसी दरांचा तुलनात्मक अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आला आहे. दरम्यान, या अहवालाला सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यास नवे दर लागू होतील. (PUC Rate Hike)
PUC Rate Hike | संभाव्य नवे दर
दुचाकी : सध्याचे 50 रुपये → नवे 58 ते 60 रुपये
तीनचाकी (पेट्रोल) : सध्याचे 100 रुपये → नवे 120 रुपये
चारचाकी (पेट्रोल, CNG, LPG) : सध्याचे 125 रुपये → नवे 145 ते 150 रुपये
चारचाकी (डिझेल) : सध्याचे 150 रुपये → नवे 174 ते 180 रुपये
ही वाढलेली रक्कम जीएसटी आणि इतर शुल्क वगळता आकारली जाईल.
“नो पीयूसी, नो फ्युएल” मोहीम :
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी स्पष्ट केले की, भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी, नो फ्युएल’ ही योजना काटेकोरपणे राबवली जाईल. यासाठी सीसीटीव्ही आणि वाहन क्रमांक स्कॅनिंग प्रणालीचा वापर केला जाणार आहे. ज्या वाहनाचे पीयूसी वैध नसेल त्यांना इंधन दिले जाणार नाही. मात्र, गैरसोय टाळण्यासाठी त्याच पंपावर तात्काळ पीयूसी प्रमाणपत्र काढून देण्याची सुविधा उपलब्ध असेल. (PUC Rate Hike Maharashtra)
सरकारने स्पष्ट केले आहे की, अवैध प्रमाणपत्र निर्मिती पूर्णपणे बंद झाली पाहिजे. युनिक आयडेंटिटी (UID) असलेले प्रमाणपत्र तयार होईल, ज्याची वेळोवेळी तपासणी शक्य होईल. यामुळे पर्यावरणपूरक धोरणे काटेकोरपणे अंमलात आणता येतील.






