राजकीय उलथापालथ! गावपातळीवर ‘या दिग्गजांना मोठा धक्का

On: December 21, 2025 1:32 PM
ZP Election Result 2026
---Advertisement---

Maharashtra Local Body Election 2025 | राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल समोर येत असताना महायुतीने एकूणच घवघवीत यश मिळवल्याचे चित्र आहे. त्या तुलनेत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून काँग्रेस वगळता अन्य घटकांना अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कुठे बहीण, कुठे भाऊ, कुठे मुलगा-मुलगी तर कुठे जवळचा कार्यकर्ता निवडणुकीच्या रिंगणात होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर नेत्यांनी स्वतः मैदानात उतरून प्रचारात मोठी ताकद लावली होती. (Municipal Council Results)

मात्र निकालांनी अनेक राजकीय दिग्गजांना त्यांच्या होमपिचवरच धक्का दिला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, तसेच आमदार रमेश बोरनारे यांना या निवडणुकांमध्ये अप्रत्यक्षपणे पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गावगाड्यातील मतदारांनी दिलेला कौल येत्या विधानसभा आणि लोकसभा राजकारणासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

गुलाबराव पाटील, पटेल, बोरनारे यांना घरच्या मैदानात फटका :

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव हे गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र याच ठिकाणी महाविकास आघाडी प्रणित धरणगाव शहर विकास आघाडीच्या उमेदवार लीलाबाई चौधरी यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकत महायुतीला मोठा धक्का दिला आहे. चौधरी यांनी महायुतीच्या वैशाली भावे यांचा पराभव करत गुलाबराव पाटील यांच्या वर्चस्वाला तडा दिला आहे.

गोंदिया नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना त्यांच्या होमपिचवरच धक्का बसला आहे. नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादी उमेदवार माधुरी नासरे या चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या असून काँग्रेसचे उमेदवार सचिन शेंडे आघाडीवर आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर येथे आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांचा पराभव झाला असून भाजपचे दिनेश परदेशी विजयी झाले आहेत. हा निकाल शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Maharashtra Local Body Election 2025 | रक्षा खडसे अपयशी; बीडमध्ये पंकजा मुंडेंची रणनीती यशस्वी :

जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये (Muktainagar) केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना होमपिचवर मोठा धक्का बसला आहे. नगरपंचायत निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुलीने २५६१ मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपचं नेतृत्व रक्षा खडसे करत असताना मतदारांनी वेगळा कौल दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे (Pankja Munde) यांनी आपले वर्चस्व कायम ठेवत अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. बीड, गेवराई, अंबाजोगाई आणि धारूरमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर असून परळीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र लढत असल्याचे चित्र आहे. पंकजा मुंडे यांनी नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करत आखलेली रणनीती यशस्वी ठरल्याचे या निकालांतून स्पष्ट झाले आहे.

News Title : Maharashtra Local Body Election 2025: From Raksha Khadse to Gulabrao Patil, Big Leaders Face Setback in Municipal Council Results

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now