Rain Alert | महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही तास राज्यातील अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असा इशारा देण्यात आला आहे.
दोन-तीन दिवसांपासून सतत पावसाचा जोर सुरू असून मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रभर पाऊस कोसळला. यामुळे काही ठिकाणी रेल्वे सेवा उशिराने सुरू झाली असून रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले. (Maharashtra Rain Alert)
कोकण व घाटमाथ्यावर रेड अलर्ट, इतर भागात ऑरेंज अलर्ट :
हवामान विभागाने कोकण आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे. सातारा, रायगड, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, नांदेड, परभणी, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने शेतकरी व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभरात पावसाची तीव्रता वाढल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
Rain Alert | मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान, गावांचा संपर्क तुटला :
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. पळसखेडा गावातील पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. चिखली नदीच्या पुराने घरे आणि दुकाने पाण्याखाली गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.
शेतात पाणी शिरल्याने पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहेत. अनेक गावांमध्ये अजूनही पाणी ओसरलेले नसल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
धरणातील पाणी साठ्यात वाढ, नागरिकांना सतर्कतेचा इशारा :
अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांच्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणाच्या पाणी साठ्यात सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यंदा मात्र पावसामुळे साठा झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Maharashtra Rain Alert)
दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातही ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पूरस्थितीमुळे नागरिकांना प्रशासनाने सतत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई-पुण्यासह राज्यभरात वाहतुकीवर परिणाम :
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा उशिराने सुरू आहे. शहरातील खालच्या भागात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पुण्यातही वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून रायगड, सातारा आणि कोल्हापूर येथे पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची परिस्थिती गंभीर बनली आहे. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.






