Tukaram Mundhe | सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर सामूहिक भोजनाचे आयोजन केले जाते. या ठिकाणी तयार होणाऱ्या अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नवीन नियोजन केले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या निर्देशानुसार पंगत आयोजित करणाऱ्यांना आता काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. कार्यक्रमाच्या आधी प्रशासनाला माहिती देणे आवश्यक असेल.
पंगतीपूर्वी परवानगी आणि साहित्याची माहिती :
सार्वजनिक ठिकाणी जेवणाची पंगत किंवा सामूहिक भोजनाचा कार्यक्रम घेण्यापूर्वी आयोजकांना किमान सात दिवस अगोदर परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कार्यक्रम अचानक आयोजित करण्याऐवजी त्याची पूर्वकल्पना संबंधित यंत्रणेला देणे आवश्यक ठरणार आहे. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांसाठी भोजन तयार केले जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये अन्न सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला अधिक वेळ मिळणार आहे.
यासोबतच कार्यक्रमासाठी स्वयंपाक करणाऱ्या केटररकडून वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाची माहितीही घेतली जाणार आहे. स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य नेमके कोणत्या ठिकाणाहून किंवा कोणत्या विक्रेत्याकडून खरेदी करण्यात आले, याचा तपशील उपलब्ध करून द्यावा लागेल. त्यामुळे अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणे आणि गरज भासल्यास त्यांच्या स्रोताची पडताळणी करणे शक्य होणार आहे. सामूहिक भोजनाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, हा या नियोजनामागील प्रमुख उद्देश आहे.
Tukaram Mundhe | 3 सप्टेंबरपासून वर्षभर विशेष ॲक्शन प्लॅन :
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ईद, होळी, बकरी ईद, गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी अशा विविध सणांच्या पार्श्वभूमीवर वर्षभरासाठी विशेष अन्न सुरक्षा कृती आराखडा तयार केला आहे. तुकाराम मुंढे यांनी ईद असो किंवा दिवाळी, प्रत्येक सणाच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न मिळणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. राज्यात ‘सेफ फूड अँड सेफ ड्रग’ ही संकल्पना राबवली जात असून, सणांच्या दिवसांत अन्नपदार्थांची मागणी अचानक वाढत असल्याने गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते.
यापूर्वी विविध सणांच्या काळात अन्न सुरक्षा कायद्यानुसार तपासणी आणि कारवाई केली जात होती; मात्र संपूर्ण वर्षासाठी सणनिहाय आणि ठरावीक पद्धतीचे नियोजन नव्हते. ही बाब लक्षात घेऊन 3 सप्टेंबरपासून जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतील सण-उत्सवांचा विचार करून विशेष ॲक्शन प्लॅन राबवण्यात येणार आहे.
तसेच या व्यवस्थेत कोणत्याही एका धर्माच्या सणासाठी स्वतंत्र नियम ठेवले जाणार नाहीत. सर्व धर्मांच्या सण, उत्सव आणि संबंधित कार्यक्रमांमध्ये अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी समान पद्धतीने केली जाईल. उपवासाचे पदार्थ, खाद्यतेल, सुकामेवा, बेकरीतील खाद्यपदार्थ तसेच ऑनलाइन माध्यमातून विक्री होणाऱ्या अन्नावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे महाप्रसाद, भंडारा आणि लंगरमध्ये तयार करून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या भोजनाचीही तपासणी होईल. या कार्यक्रमांचे आयोजक आणि अन्न तयार करणाऱ्या स्वयंपाक्यांना नियमित फूड सेफ्टी प्रशिक्षण देण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.






