Beed Pune Railway | मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बीड-पुणे रेल्वे सेवेचा प्रारंभ 17 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून ही सेवा सुरू केली जाणार आहे. या मार्गासाठी आवश्यक तांत्रिक आणि सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच डिसेंबरअखेर बीड ते मुंबई (पनवेल) रेल्वे सुरू करण्याचे नियोजन असून, त्यासाठी कामांना वेग देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रेल्वे मार्गाच्या कामांचा आढावा :
सह्याद्री अतिथीगृहात अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यासोबतच बीड-पुणे आणि बीड-मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) होत्या. त्यांनी संबंधित यंत्रणांना रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
बीडला रेल्वे जोडणी मिळावी यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता, असे सुनेत्रा पवार यांनी बैठकीत नमूद केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अहिल्यानगर-बीड-परळी या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली. बीडकरांची सुमारे 40 वर्षांची प्रतीक्षा संपवत 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू झाली होती. आता याच ऐतिहासिक दिवशी 17 सप्टेंबर 2026 रोजी बीड-पुणे रेल्वे सेवा सुरू केली जाणार आहे.
Beed Pune Railway | डिसेंबरअखेर बीड-मुंबई रेल्वेचे लक्ष्य :
बीड-पुणे रेल्वे सुरू झाल्यानंतर बीड जिल्ह्याचा पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्राशी थेट रेल्वे संपर्क अधिक मजबूत होईल. या जोडणीचा परिणाम कृषी, उद्योग, शिक्षण, व्यापार आणि सामाजिक क्षेत्रावर होण्याची अपेक्षा आहे. रेल्वेमुळे नागरिकांना प्रवासासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी होण्यास मदत मिळेल. त्यामुळे बीडच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
17 सप्टेंबरच्या सेवेपूर्वी उर्वरित तांत्रिक, प्रशासकीय आणि सुरक्षाविषयक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर डिसेंबर 2026 अखेर बीड-मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक कामाचा कालबद्ध आराखडा तयार करून सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यास सांगण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी होणाऱ्या बीड-पुणे रेल्वेच्या शुभारंभाची तयारी नियोजनबद्ध आणि समन्वयाने करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. बीड-पुणे आणि त्यानंतर बीड-मुंबई रेल्वे ही केवळ प्रवासाची सुविधा नसून जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारी जोडणी ठरेल. दिवंगत अजित पवार यांनी पाहिलेल्या विकसित बीडच्या स्वप्नाला या रेल्वे मार्गामुळे महत्त्वाची चालना मिळेल, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.






