Document Registration | महाराष्ट्र राज्यात (Maharashtra state) मालमत्ता आणि इतर दस्तऐवजांची नोंदणी (Document Registration) करणे आता आणखी महाग झाले आहे. राज्य सरकारने नोंदणी मुद्रांक शुल्क विभागामार्फत (Registration and Stamps Department) आकारल्या जाणाऱ्या दस्त हाताळणी शुल्कात (document handling charges) प्रति पान २० रुपयांवरून थेट ४० रुपये अशी दुप्पट वाढ केली आहे.
हाताळणी शुल्कात दुप्पट वाढ
नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या कागदपत्रांच्या स्कॅनिंग आणि हाताळणीसाठी यापूर्वी प्रति पान २० रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र, राज्य शासनाने आता या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, नवीन दर प्रति पान ४० रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक नियंत्रक (Inspector General of Registration and Controller of Stamps – IGR) कार्यालयाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे घर खरेदीदार आणि इतर मालमत्ता व्यवहार करणाऱ्या नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. नुकतीच नोंदणी शुल्कात वाढ झालेली असताना, हाताळणी शुल्कातही वाढ का करण्यात आली, असा प्रश्न ‘असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स’ने (Association of Service Providers) उपस्थित केला आहे.
वाढीव खर्च आणि सरकारी महसूल
नोंदणी मुद्रांक विभागाच्या म्हणण्यानुसार, वाढलेली उपनिबंधक कार्यालये, संगणकीकरणाचा वाढता व्याप, ३५ विविध प्रणाली, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि नेटवर्क देखभाल खर्चामुळे विभागाचा परिचालन खर्च वाढला आहे. कुशल मनुष्यबळावरील खर्चही वाढला आहे, त्यामुळे ही शुल्कवाढ करण्यात आल्याचे संकेत आहेत.
राज्य सरकारला दस्त नोंदणीतून सरासरी दरमहा सुमारे ४००० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. आता या हाताळणी शुल्कातील वाढीमुळे सरकारच्या तिजोरीत आणखी भर पडणार आहे. या दरवाढीमुळे नेमकी किती महसुली वाढ होईल, याची आकडेवारी लवकरच उपलब्ध होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Title : Maharashtra Doubles Document Handling Fees for Registration






