Greenfield Highway | महाराष्ट्रातील रस्ते विकास आणि वाहतूक व्यवस्थेला नवी गती मिळणार आहे. मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या महत्त्वाच्या बैठकीत राज्याला नव्या सहापदरी Greenfield महामार्गाची मंजुरी मिळाली आहे. या महामार्गामुळे पुणे–शिरूर (Pune- shirur) मार्गावरील वाढता वाहतूक ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, औद्योगिक क्षेत्रांमधील संपर्क अधिक सक्षम होणार आहे. या प्रकल्पामुळे आगामी काळात रस्ते वाहतुकीत मोठा बदल अपेक्षित आहे. (Pune Shirur Expressway)
या प्रकल्पानुसार पुणे–शिरूर महामार्गावरील ५३.४ किमी अंतरावर चार पदरी अॅट-ग्रेड रस्ता आणि सहापदरी उन्नत महामार्ग उभारण्यात येणार आहे. विद्यमान वाहतुकीच्या तुलनेत हा नवा मार्ग चौपट वेगाने प्रवास सुलभ करणार असल्याने पुणे आणि आसपासच्या भागातील नागरिकांसाठी ही मोठी आनंदवार्ता मानली जात आहे.
समृद्धी महामार्गाला नवा कनेक्शन, ५८.८ किमीचा भाग सहापदरी :
या निर्णयातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्यासाठी मंजूर झालेली नवी रचना. शेंद्रा औद्योगिक वसाहत–बिडकीन–ढोरेगाव हा ५८.८ किमी लांबीचा रस्ता आता पूर्णपणे सहापदरी करण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाशी असलेला औद्योगिक आणि व्यापारी संपर्क अधिक बळकट होणार आहे.
याशिवाय करमाड–बिडकीन मार्गे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नव्या Greenfield सहापदरी महामार्गाला तत्त्वतः हिरवा कंदील देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेताना प्रकल्पातील कामांमध्ये विलंब होऊ नये, तसेच प्रकल्प ३ वर्षांत पूर्ण व्हावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
Greenfield Highway | मेट्रोसह त्रिस्तरीय ‘व्हायाडक्ट’, भूसंपादन प्रक्रियेला गती :
या प्रकल्पातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे पुणे–शिरूर (Pune- shirur) मार्गावरील ३५ किमी पैकी ७.४० किमी भागात त्रिस्तरीय ‘व्हायाडक्ट’ बांधला जाणार आहे. हा मार्ग जमिनीवरील रस्ता + त्यावर उन्नत रस्ता + त्याहून वरून मेट्रो अशा तीन स्तरांत असेल. हे काम महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. (Greenfield Highway Maharashtra)
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर (Sambhajinagar- ahilyanagar) मार्ग निकृष्ट अवस्थेत असल्याची दखल घेऊन मुख्यमंत्री फडणवीस (Devendra fadanvis) यांनी तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेंद्रा (करमाड) ते बिडकीन (३२.८ किमी) आणि बिडकीन ते ढोरेगाव (२६ किमी) या सहापदरी मार्गांसाठी लागणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे पुणे, शिरूर, छत्रपती संभाजीनगर आणि समृद्धी महामार्गादरम्यानचा प्रवास वेगवान, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक विस्तारात हा प्रकल्प मोठी भूमिका बजावणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






