Mahakumbh Mela | प्रयागराज (Prayagraj) येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात (Mahakumbh Mela) गुरुवारी सेक्टर 22 च्या बाहेरील चमणगंज चौकीजवळ एका मोकळ्या जागेत भीषण आग लागली. या आगीत जवळपास 15 तंबू जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तात्काळ आग विझवली.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी आग विझवताना दिसत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशामक यंत्रे (Fire Extinguishers) आणि इतर सुरक्षा उपकरणांचा वापर केला. व्हिडिओमध्ये जळालेले तंबू देखील दिसत आहेत.
अग्निशमन दलाची तत्परता-
माध्यमांशी बोलत असताना, मुख्य अग्निशमन अधिकारी (कुंभ) प्रमोद शर्मा यांनी सांगितले की, दुपारी आगीची माहिती मिळाली आणि ती तात्काळ विझवण्यात आली. योग्य रस्ते नसल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास अडचण आली, परंतु अखेरीस कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत (Mahakumbh Mela) न होता आग पूर्णपणे विझवण्यात आली.
#WATCH | Fire broke out in a few tents erected in an open area under the Chatnag Ghat Police Station area in Prayagraj today. The fire was doused and there was no casualty in the incident as per the Fire Department
Video source: UP Fire Department pic.twitter.com/23kKEVkRkl
— ANI (@ANI) January 30, 2025
शर्मा यांनी पुढे सांगितले की, उपविभागीय दंडाधिकार्यांच्या मते, हे तंबू अनधिकृत होते. “या आगीत 15 तंबू जळून खाक झाले. आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे,” असे ते म्हणाले. मौनी अमावस्येच्या (Mauni Amavasya) दिवशी, बुधवारी सकाळी संगमावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या (Stampede) दुर्घटनेनंतर अवघ्या एका दिवसानंतर ही आगीची घटना घडली आहे.
30 भाविकांचा मृत्यू झाला-
चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाला होता तर जवळपास 60 जण जखमी झाले होते. हिंदू दिनदर्शिकेतील सर्वात पवित्र दिवसांपैकी एक असलेल्या मौनी अमावस्येला पवित्र स्नान करण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली होती. महाकुंभचे डीआयजी वैभव कृष्णा यांनी या घटनेला गर्दीचा दबाव कारणीभूत असल्याचे सांगितले. गर्दीने बॅरिकेड्स तोडून दुसऱ्या बाजूला उडी मारल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाकुंभमध्ये (Mahakumbh Mela) चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh Government) गर्दी व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी प्रयत्न तीव्र केले आहेत. पहाटेच्या थंडी आणि दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी असूनही, गुरुवारी भाविक ‘मोक्ष’ मिळवण्यासाठी संगमावर आणि इतर घाटांवर पवित्र स्नान करण्यासाठी येत राहिले.
वसंत पंचमीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था-
उत्तर प्रदेश सरकारनुसार, गुरुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत 1.52 कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले. महाकुंभमध्ये सहभागी होणाऱ्या एकूण भाविकांची संख्या 27.58 कोटींच्या पुढे गेली आहे. डीआयजी महाकुंभ वैभव कृष्णा यांनी सांगितले की, वसंत पंचमीला (3 फेब्रुवारी) अमृत स्नानासाठी पोलिस सक्रियपणे तयारी करत आहेत आणि मेळा परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. “अपेक्षित मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, आम्ही पोलिस कर्मचारी आणि सुरक्षा दलांची तैनाती मजबूत करत आहोत,” असे ते म्हणाले.
त्यांनी असेही नमूद केले की गुरुवारी गर्दीचा दबाव कमी होता आणि सर्व पूल पुन्हा खुले करण्यात आले होते, ज्यामुळे मेळा परिसरात सुरळीत हालचाल होऊ शकली. मात्र, वसंत पंचमीपूर्वी गर्दी नियंत्रणासाठी मुख्य ठिकाणी नवीन निर्बंध लागू केले जातील. डीआयजी यांनी पुढे नमूद केले की, अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांनुसार, व्हीआयपींना मौनी अमावस्येला मेळा परिसरात फिरण्याची परवानगी नव्हती आणि वसंत पंचमीलाही त्याच प्रोटोकॉलचे पालन केले जाईल.






