Mahadev Munde Murder Case | परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्येला तब्बल 21 महिने पूर्ण झाले असूनही अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. मात्र, आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक संशयित आरोपी गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झालं असल्याची माहिती समोर आली आहे. (Mahadev Munde Murder Case)
महादेव मुंडे यांची 20 ऑक्टोबर 2023 रोजी तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण परळी शहर आणि बीड जिल्हा हादरला होता. गेल्या 21 महिन्यांत तब्बल आठ तपास अधिकारी बदलले गेले, मात्र तरीही तपास फारसा पुढे सरकला नव्हता. त्यामुळे मृताच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वेळोवेळी आंदोलन आणि मागण्या करत सरकारकडून न्यायाची मागणी केली.
पाच संशयितांची चौकशी सुरू; मुख्यमंत्र्यांकडे थेट आरोपींची नावे :
या प्रकरणात पोलिसांनी 10 ते 12 जणांची चौकशी केली असून सध्या 5 संशयित आरोपींच्या चौकशीला वेग आला आहे. एका गुप्त साक्षीदाराकडूनही महत्त्वाची माहिती मिळाली असून ती तपासात उपयुक्त ठरणार असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे, कालच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, त्यांनी त्यांच्यासमोर थेट आरोपींची नावे मांडल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिस तपासात होत असलेल्या हलगर्जीपणाबद्दल नाराजी व्यक्त करत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी यापूर्वी विषप्राशन केल्याची घटना देखील घडली होती. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. आता मुख्यमंत्री भेटीनंतर या प्रकरणात तपासाला गती मिळाल्याचं चित्र दिसत आहे. (Mahadev Munde Murder Case)
Mahadev Munde Murder Case | अजून अटक नाही, मात्र लवकरच मोठा खुलासा होण्याची शक्यता :
संशयित गोट्या गित्तेला अटक करण्यात यश मिळाल्यास, महादेव मुंडे हत्या प्रकरणातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अजून अधिकृतपणे कोणालाही अटक केल्याचं जाहीर केलेलं नसून, लवकरच या प्रकरणात मोठी अपडेट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातही बीड जिल्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणातील एक एस आरोपी अद्याप फरार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनावर या प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे आरोप देखील होत आहेत.






